घरातूनच शिकवा मासिकपाळी व्यवस्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:55 AM2018-05-29T00:55:26+5:302018-05-29T00:55:26+5:30
गेल्या काही वर्षांपासून मासिक पाळीविषयी जाहीरपणे बोलणे सुरू झाले. त्यानंतर, पाळीविषयीचे समज-गैरसमज, ग्रामीण आणि शहरी भागांतील सॅनिटरी पॅडविषयीची जनजागृती
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मासिक पाळीविषयी जाहीरपणे बोलणे सुरू झाले. त्यानंतर, पाळीविषयीचे समज-गैरसमज, ग्रामीण आणि शहरी भागांतील सॅनिटरी पॅडविषयीची जनजागृती, त्याची विल्हेवाट या मुद्द्यांवर चर्चा होऊ लागली. २८ मे रोजी असणाऱ्या ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन’ पार्श्वभूमीवर आता मासिक पाळी दरम्यानच्या स्वच्छतेवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले.
फक्त पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव शोषून घेण्यासाठी कापड वापरणे गरजेचे आहे. मासिक पाळीसाठी बाजारात कित्येक प्रकारची सॅनिटरी पॅड, नॅपकिन्स सहज उपलब्ध होतात. जुन्या स्वच्छ कापडाच्या घड्या वापरून स्वच्छता पाळता येते. एवढे केले म्हणजे स्वच्छतेची काळजी घेतले, असे होत नाही. पाळीचे दिवस सोडूनही त्या भागाची काळजी घ्यायला हवी, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुशीला केनी यांनी सांगितले. मासिक पाळीविषयी गुप्तता न पाळता, त्याविषयी आईने खुलेपणाने मुलींशी संवाद साधला पाहिजे. गेल्या काही वर्षांत पाळी येण्याचे वय कमी झाले आहे, त्यामुळे पाळीविषयीचे अज्ञान त्या चिमुकल्यांमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ या विषयाची सुरुवात शाळांमधून केली पाहिजे, जेणेकरुन समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांना याविषयीची माहिती प्राथमिक टप्प्यातच मिळू शकेल, असे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कौशिक त्रिवेदी यांनी नमूद केले.
डॉ.त्रिवेदी यांनी सांगितले की, स्त्रियांची अंतर्वस्त्रे स्वच्छ असावी, तसेच या काळात ती दोन वेळा बदलावी. पाळीच्या काळात दर २-३ तासांनी सॅनिटरी पॅड बदलला पाहिजे. म्हणजे पॅड जास्त भिजल्यामुळे त्यात बॅक्टेरिया होणार नाहीत व त्यामुळे त्या भागाला जास्त ओलावा जाणवणे, तसेच इतर त्रास होणार नाही व खाज येणार नाही, याची काळजी घ्यावी. जेव्हा-जेव्हा रक्तस्त्राव होतो, तेव्हा जड काम करू नये किंवा खूप जास्त व्यायाम करू नये. त्यामुळे रक्तस्त्राव जास्त होणार नाही, पण जर जास्त रक्तस्त्राव होत असेल, तर मोठ्या साइजचा नॅपकिन वापरावा. वयात येणाºया मुलींना सॅनिटरी पॅड कसा वापरावा, केव्हा बदलला पाहिजे व तो वापरून झाल्यावर तो कुठे टाकावा, याची माहिती प्रत्येक आईने मुलीला दिली पाहिजे. सगळ्या महिलांनी स्वच्छ, निर्जंतूक असे नॅपकिन्स वापरावे. मासिक पाळीबद्दल घृणा करू नये, त्याबद्दल स्वच्छता ठेवावी, पाळी येणे अतिशय नैसर्गिक आहे.