संपकऱ्यांना मेस्मा लावणार; बेस्ट प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 06:29 PM2019-01-05T18:29:55+5:302019-01-05T18:35:18+5:30
संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात मेस्मांतर्गत कायदा लागू करुन कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बेश्ट प्रशासनाने दिला आहे. तसेच आगारप्रमुखांना सुट्ट्या देऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासन आणि कर्मचारी हे सामने - सामने येणार आहेत.
मुंबई - बेस्टकर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा पवित्रा स्वीकारला आहे. वेतनवाढ आणि वेतन निश्चितीबद्दलच्या रखडलेल्या मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्यानं बेस्टकर्मचारीसंपाचं हत्यार उपसणार आहेत. बेस्ट महाव्यवस्थापकांसोबत कामगार संघटनेची बैठक पार पडली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असल्याने ३० हजार बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात मेस्मांतर्गत कायदा लागू करुन कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बेस्ट प्रशासनाने दिला आहे. तसेच आगारप्रमुखांना सुट्ट्या देऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासन आणि कर्मचारी हे सामने - सामने येणार आहेत.
महाव्यवस्थापकांसोबतच्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्यानं बेस्ट कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यानंतर संप करण्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये मतदान घेण्यात आलं होतं. यात संपाच्या बाजूनं भरघोस मतदान झालं होतं. बेस्टचे सुमारे 30 हजार कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. याचा मोठा परिणाम मुंबईतील वाहतुकीवर होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनमानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
* कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?
- बेस्टचा 'क' अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या 'अ' अर्थसंकल्पात विलीन करण्याबद्दलच्या मंजूर ठरावाची तातडीनं अंमलबजावणी करावी
- 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रुपयांपासून सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावानं वेतन निश्चिती करण्यात यावी.
- एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतन करारावर तातडीनं वाटाघाटी सुरू कराव्या.
- 2016-17 आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा.
- कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढला जावा
- अनुकंपा भरती सुरू करावी