Join us  

CoronaVirus News : कोरोना नियंत्रणात आला म्हणून मास्क ‘गळ्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 2:12 AM

मास्कचा ठिकाणा आता तोंड आणि नाकावरून थेट गळ्याभोवती तयार झाला आहे. जी बाब पोलिसांच्या नाकीनऊ आणत आहे.

मुंबई : कोरोनाचा विळखा झोपडपट्टी परिसरात सैल पडू लागला असला तरी त्याबाबत घ्यायच्या खबरदारीबाबत नागरिक अजूनही संवेदनशील नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मास्कचा ठिकाणा आता तोंड आणि नाकावरून थेट गळ्याभोवती तयार झाला आहे. जी बाब पोलिसांच्या नाकीनऊ आणत आहे.मालाड पूर्वच्या कुरार व्हिलेज, कोकणीपाडा, आप्पापाडा, क्रांतीनगर, पठाणवाडी, तर पश्चिमच्या मालवणी गाव, मढ मार्केट, गेट क्रमांक १ ते गेट क्रमांक ८ यासारख्या ठिकाणी कोरोनाच्या फैलावावर आळा बसविणे पालिकेच्या पी उत्तर विभाग, तसेच कुरार व मालवणी पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. पण ते यशस्वीपणे पेलत त्यांनी यात बऱ्यापैकी यशही मिळवले.मात्र नागरिकांनी मास्क घालून राहणे आवश्यक असल्याचे वारंवार बजावूनही नाकतोंड झाकण्यासाठीचे मास्क नागरिक खेचून गळ्यात अडकवत खुशाल गप्पा मारत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचसोबत बायकाही मास्क न लावता बाहेर पडतात आणि पोलिसांनी टोकले की पदर तोंडाला लावून पळ काढतात अशी स्थिती आहे. काही लोक ‘जवळच राहतो साहेब’ असे उत्तर देत पळ काढतात.‘अब कोरोना कम हो गया ना सर,’ असेही उत्तर दिले जाते. दंडाच्या रकमेपासून वाचण्यासाठी हे प्रकार केले जात असल्याने मास्क हे त्यांच्या स्वत:साठी तसेच कुटुंबीयांसाठी आणि परिणामी समाजाच्या सुरक्षेसाठी असल्याचे त्यांच्या अजूनही लक्षात आलेले नाही. नागरिक म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव झाली नसल्याची खंतही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. मात्र झोपडपट्टी परिसरात पत्रे उचकटण्याचे प्रकार कमी झाले आहेत. फिजिकल डिस्टन्स ठेवण्याबाबतही लोकांमध्ये बºयापैकी जागरूकता आली आहे.पोलिसांची ‘पकडापकडी’ थांबलीगणरायाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र गेल्या वर्षी होती त्यासारखी ग्राहकांची गर्दी यावर्षी पाहायला मिळत नाही. नारळ, हार-फुले, फळे तसेच सजावटीच्या साहित्यासाठी बाजारात झुंबड उडायची. मात्र यावर्षी ग्राहक आणि दुकानदार या दोघांच्या मनात कोरोनाबाबत भीती आहे.कधी कोण पॉझिटिव्ह व्यक्ती आपल्या संपर्कात येईल कळणार नाही. त्यामुळे आपापल्या परीने योग्य ती काळजी मालाडच्या साईनाथ मंडईमध्ये घेतली जातेय. फारशी गर्दी बाजारात नसल्याने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राखण्यासाठी सतर्क असलेल्या पोलिसांना लाठी घेऊन नागरिकांच्या मागे धावावे लागत होते. मात्र आता ती पकडापकडी थांबल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस