मास्क आला अन् लिपस्टिकची लालीच उडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:07 AM2021-04-30T04:07:47+5:302021-04-30T04:07:47+5:30
सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीसह उत्पादन व्यवसायावर मोठा परिणाम लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मास्क लावल्याने आपली लिपस्टिक खराब होत असल्याचा ...
सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीसह उत्पादन व्यवसायावर मोठा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मास्क लावल्याने आपली लिपस्टिक खराब होत असल्याचा दावा करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या बराच व्हायरल होत आहे. मास्क न लावण्यासाठी देण्यात आलेले हे कारण आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हानिकारक असले तरी कॉस्मेटिक्स विक्रेते, ब्यूटी पार्लर चालविणाऱ्या महिलांच्या व्यवसायावर काेराेनाचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे जणू त्यांच्या गालांची लालीच उडाली आहे.
कोरोना, लॉकडाऊनच्या या दिवसांत व्यापार, वाहन, कपड्यांसोबत लिपस्टिक इंडस्ट्रीवरही मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात आणि त्यापूर्वीच्या अनलॉक काळातही मास्कने या व्यापाराला जबरदस्त हादरा दिला. कार्यालयात किंवा बाहेर जाताना रोज लिपस्टिक लावणाऱ्या महिला आणि युवती आता मास्कमुळे लिपस्टिक वापरू शकत नाहीत. जर लावलीच, तर मास्कमुळे ती दिसत नाही आणि ओठांच्या सभोवती पसरण्याची शक्यता अधिक असते. यामुळे या काळात इतर सौंदर्य प्रसाधनांपेक्षा लिपस्टिकचा वापर बराच घटला आहे.
* विक्रीत ५० ते ६० टक्क्यांनी घट
लिपस्टिक ही सौंदर्य प्रसाधनांमधील अतिशय महत्त्वाची वस्तू समजली जात असून तरुणी असाे, गृहिणी किंवा वर्किंग वुमन; प्रत्येक महिलेकडून याचा वापर होतो. मात्र कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे घरात अडकून पडलेल्या आणि वर्क फ्रॉम होम करणाऱ्या महिलांमुळे याच्या वापरात घट झाली. साहजिकच याचा थेट परिणाम ही सौंदर्य प्रसाधने उत्पादित करणाऱ्या कंपन्यांवर झाला आणि त्यांचे उत्पादन घटले. विक्रीच नाही तिथे उत्पादनावर भरमसाट खर्च करून काय उपयोग, असे धोरण हाती घेतल्याची माहिती सौंदर्य प्रसाधने विक्री करणाऱ्या एका दुकानदाराने दिली. लॉकडाऊनच्या काळात दुकाने बंद असल्यामुळेही याची विक्री थेट ५० ते ६० टक्क्यांनी घटल्याची माहिती त्यांनी दिली. लिपस्टिक आणि इतर सौंदर्य प्रसाधनांचा वापर आता रोज होत नसून घरगुती कार्यक्रमापुरताच मर्यादित झाल्याने या व्यवसायात असणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसल्याची माहिती सौंदर्य प्रसाधनांच्या व्यवसायातील एका व्यापाऱ्याने दिली.
* मोठ्या बाजारपेठा बंद असल्याचा फटका
दादर, चर्चगेट अशा ठिकाणी लिपस्टिक आणि इतर सौंदर्य प्रसाधनांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. या मोठ्या बाजारपेठांतून ही उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचत असतात. लॉकडाऊन काळात बंद पडलेल्या बाजारपेठा, डिसेंबर, जानेवारीमध्ये सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आल्याने लाखो रुपयांची उत्पादने आणूनही हजार रुपयांचा मालही विकला न गेल्याची प्रतिक्रिया दुकानदार हताशपणे देत आहेत.
* महिलांच्या प्रतिक्रिया
मास्क होतात खराब
सध्या वर्क फ्रॉम होम सुरू आहे. बाहेर जायचेच असेल तर मास्क लावूनच जावे लागते. जवळच्या नातेवाइकांकडे गेले तरी मास्क लावावाच लागताे. त्यातही लिपस्टिक लावल्याने मास्क खराब होतो. घामामुळे लिपस्टिकही निघून जाते आणि चेहरा खराब होतो. यामुळे आता लिपस्टिकचा वापर थांबविला आहे.
- राजश्री खरे
* गेले अनेक महिने नवीन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केलीच नाही
बाहेर कामानिमित्त पडणाऱ्या महिलांना मास्क लावावाच लागतो. गेले अनेक महिने नवीन सौंदर्य प्रसाधनांची खरेदीच केलेली नाही. आवश्यकता नसताना लिपस्टिक किंवा इतर सौंदर्य प्रसाधने पडून राहिल्यास ती खराब होण्याची भीती जास्त असते. साहजिकच मार्केटमध्येही याचा परिणाम दिसून आला असेल यात वाद नाही.
- मंदाकिनी आपटे
-----------------------------------