मास्क, आजोबा, जबाबदारीची जाणीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:06 AM2021-05-26T04:06:59+5:302021-05-26T04:06:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मास्कशिवाय बाहेर फिरणे म्हणजे संकटाला थेट आमंत्रण देण्यासारखेच आहे. अर्थात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मास्कशिवाय बाहेर फिरणे म्हणजे संकटाला थेट आमंत्रण देण्यासारखेच आहे. अर्थात याची जाणीव असलेले सजग नागरिक मास्क वापरतातच; परंतु या उलट काही लोक बेफिकीर असल्याचेही जाणवते; पण एखादी सुजाण व्यक्ती चुकून घरी मास्क विसरून बाहेर पडली, तर तिला स्वतःचा राग येणारच. त्यातही अशी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असेल, तर तिची गोष्ट अजूनच वेगळी ठरणार. अशीच एक घटना मंगळवारी एका एटीएम सेंटरच्या बाहेर घडली; पण त्यातून अनेकांनी बोध घेतला.
मंगळवारी सकाळी माहीमच्या एका बँकेच्या एटीएम सेंटरबाहेर ८-१० जणांची रांग लागली होती. अंदाजे पंचाहत्तरीचे एक आजोबा रांगेत शेवटी येऊन उभे राहिले. हातातल्या पिशवीने त्यांनी त्यांचे तोंड कसेबसे झाकून घेतले होते. त्यांच्या तोंडावर मास्क नसल्याचे, त्यांच्यापुढे उभ्या असलेल्या एका पासष्टीच्या आजीबाईंच्या लक्षात आले आणि त्यांनी त्यांना 'तुमचा मास्क कुठे आहे', असे काळजीपोटी विचारले. आजोबांनी त्यांचे तोंड पिशवीने अधिकच झाकून घेतले आणि त्यांना अचानक रडू फुटले.
काही क्षणांतच आजोबा हळूच रांग सोडून दूर जाऊ लागले. ते पाहताच त्या आजीबाईही त्यांच्या मागे धावत गेल्या. 'मास्क लावल्याशिवाय असे बाहेर फिरू नका', असे त्यांनी त्यांना विनविले.
त्यावर, 'घरून बाहेर पडताना मास्क सोबत घ्यायला विसरलो', असे आजोबांनी प्रत्युत्तर दिले. मात्र एकंदर प्रकारावरून त्यांना फारच ओशाळल्यासारखे झाले होते. याच रांगेत उभ्या असलेल्या प्रस्तुत प्रतिनिधीने योगायोगाने स्वतःसाठी दोन मास्क नुकतेच खरेदी केले होते. त्यातला एक मास्क आजोबांना देऊ केला असता, त्यांनी तो नाकारला. अपराधीपणाच्या भावनेतून मदत स्वीकारायलाही त्यांचे मन तयार होत नव्हते. मास्क न लावून आपण फारच मोठा गुन्हा केला असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. ते फारच खजील झाले होते. त्या आजीबाई मात्र त्यांचा पिच्छा सोडायला तयार नव्हत्या. शेवटी आजीबाईंच्या सांगण्यावरून, मास्कचे पैसे घेण्याच्या अटीवरच त्या स्वाभिमानी आजोबांनी एकदाचा मास्क स्वीकारला आणि ते शांतपणे पुन्हा रांगेत येऊन उभे राहिले. मास्क घातलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि सुरक्षिततेची भावना मात्र रांगेतील सर्वांना बरेच काही सांगून गेली.