मुंबई : कोरोना काळात अत्यावश्यक असणाऱ्या मास्कचे नानाविध प्रकार बाजारपेठांत आले आहेत. त्यात अगदी हिरेजडित मास्कपासून ते पैठणी-लेहंगा यांना मॅचिंग असणारे मास्कही विक्रीसाठी आहेत. ग्राहकांकडूनही याला प्रचंड मागणी असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र हे कापडी मास्क पूर्णपणे सुरक्षित नसून अशा स्वरूपांच्या मास्कमध्ये शास्त्रीय पद्धतीचा लेअर असणे आवश्यक असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने म्हटले आहे. यासंदर्भात मास्कच्या निर्मिती व दरनिश्चितीची मागणी करत राज्य शासनाला पत्र लिहिले आहे.
राज्यासह मुंबईतील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी मास्कच्या किमतीवरील नियंत्रणाबाबत पत्र पाठवले आहे. हल्ली बाजारात अगदी रस्त्यावरच्या फेरीवाल्यांपासून ब्रँडचे कापडी मास्क पाच ते पाचशे रुपयांपर्यंत विकले जात आहेत. या मास्कच्या दर्जा, किमतींना निर्धारित मानके नाहीत, याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे.
काेराेना संसर्गाची साखळी रोखण्यास उपयुक्तअन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या त्रिःसूत्रीमध्ये मास्कचा वापर अत्यावश्यक आहे. मात्र त्यातला फॅन्सीपणा टाळून साधे निळे शास्त्रीय पद्धतीचे मास्क संसर्गाची साखळी रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. याविषयी राज्य शासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत, शिवाय ग्राहकांनीही जागरूक राहिले पाहिजे.