- कुलदीप घायवटमुंबई : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना कोरोनापासून वाचविण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर देण्यात आले आहे. हे मास्क ‘वन टाइम युज’ आहेत. वापरून झाल्यावर त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावायची असते. मात्र याबाबत कर्मचारी अनभिज्ञ असल्याने मुंबई सेंट्रल आगारात मास्कचा कचरा दिसून येत आहे.
लॉकडाउन काळात मुंबई, पालघर, ठाणे या विभागांतून अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाऱ्यांसाठी एसटी धावत आहे. यासाठी एसटीचे कर्मचारी काम करीत आहेत. मुंबई सेंट्रल आगारात एकूण ७० ते ८० कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाºयांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्कवाटप करण्यात आले आहे. मात्र हे मास्क एकदाच वापरण्यायोग्य असल्याने ते वापरून झाल्यावर कर्मचारी कुठेही फेकत असल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. याशिवाय कोरोना काळात कुठेही थुंकणे चुकीचे आहे. परंतु, कर्मचारी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन इतस्तता थुंकत आहेत.
आगारात सफाई कर्मचाºयांची कमतरता असल्याने मास्क आणि इतर कचरा वाढत आहे. मास्क जमिनीवर पडून राहिल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. लक्षणेविरहित कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. मास्क जमिनीवर पडून राहिल्यास त्या जागेवर संसर्ग वाढू शकतो. जैविक कचºयाची योग्यरीत्या विल्हेवाट लावली गेली पाहिजे. कापडी मास्कचा वापर झाल्यावर गरम पाण्यात उकळून सुकविला पाहिजे. ‘वन टाइम युज’ मास्कला योग्य ठिकाणी योग्य काळजी घेऊन जाळले पाहिजे.- डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ