Join us

स्थानकांवरील समस्यांसाठी मध्य रेल्वेवर मनसेची धडक

By admin | Published: August 04, 2016 1:47 AM

रेल्वे स्थानकांवरील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयावर मोर्चा काढला.

मुंबई : मध्य रेल्वेच्या कॉटन ग्रीन, डॉकयार्ड रोड, चिंचपोकळी आणि परळ या रेल्वे स्थानकांवरील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयावर मोर्चा काढला. स्थानिक प्रवाशांसह मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाव्यवस्थांपकांची भेट घेत प्रवाशांची कैफियत मांडली.नांदगावकर यांनी सांगितले की, मध्य रेल्वेच्या कॉटन ग्रीन, डॉकयार्ड रोड, चिंचपोकळी आणि परळ रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या समस्या एकूण महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल हेही सुन्न झाले. त्यांनी सर्व विषयांत जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय तत्काळ कॉटन ग्रीन स्टेशनला भेट देऊन ज्या समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी उपायांची अंमलबजावणी करण्याचे मान्य केले. यावेळी शिष्टमंडळात उपाध्यक्ष नंदू चिले, विभाग अध्यक्ष विजय लिपारे, सचिव यशोधरा शिंदे यासोबत स्थानिक नागरिक व मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, शिष्टमंडळातील बहुतेक पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर घेतलेल्या सह्यांचे निवेदन आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी तक्रारी संबंधित केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रतीही यावेळी महाव्यवस्थापकांना सादर केल्या. त्यावर लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन अग्रवाल यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)>काय आहेत समस्या व उपाय कॉटन ग्रीन स्थानकाच्या पश्चिमेला एकच तिकीट घर आहे. पुलावर असलेल्या या रेल्वे स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला जाणाऱ्या प्रवाशांनाही या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी यावे लागते. त्यामुळे उत्तर दिशेस असलेल्या तिकीट घराशिवाय दक्षिण दिशेस पूर्ण वेळ आणि खालच्या बाजूस पूर्वी असलेली तिकीट खिडकी पुन्हा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या अंधारामुळे लूटमारीचे, चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे रात्री स्थानकाहून घरी जाण्यासाठी महिला वर्गाला घोळक्याने जावे लागते, परिणामी योग्य प्रकाश व्यवस्था करून रेल्वे पोलीस दलाला या ठिकाणी गस्त ठेवण्यास सांगावे.स्थानकावर आणि स्थानकावरील शौचालयात नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. शिवाय जिन्यावरील पायऱ्यांची दूरवस्था झालेली आहे. परिणामी स्वच्छता ठेवून पायऱ्यांची दुरुस्ती करावी.चिंचपोकळी स्थानकावरून फलाटावर जाण्यासाठी असलेला मार्ग पावसाळ्यात निसरडा होतो. बहुतेक प्रवासी या ठिकाणी पाय घसरून पडल्याचे निदर्शनास येते. विशेषत: ज्येष्ठ नागरिक व महिलांना खाली उतरताना व वर चढताना खूप त्रास होतो. त्यामुळे मध्यभागी रेलिंगची व्यवस्था करून तो मार्ग खरबडीत करावा; जेणेकरून भविष्यात होणारे संभाव्य अपघातापासून नागरिकांचे रक्षण होईल.परळ स्थानकात तिकीट घराजवळ इंडिकेटरची व्यवस्था करावी. शिवाय स्थानकाच्या ट्रॅकवरील परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे लुटारू प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारण्याच्या घटना येथे वारंवार घडत असतात. त्यामुळे रेल्वे पोलिसांना गस्त घालण्याचे आदेश द्यावेत.डॉकयार्ड रेल्वे स्थानकाच्या केवळ उत्तर दिशेला तिकीटघर आहे. माझगाव डॉक आणि भाऊचा धक्का या ठिकाणीही मोठ्या संख्येने ये-जा असते. परिणामी प्रवाशांच्या सोयीसाठी दुसऱ्या तिकीट घराची व्यवस्था दक्षिण-पूर्वेकडील बाजूस करावी.