AC लोकलविरोधात मुंबईत जनआंदोलन पेटणार; NCP आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 05:04 PM2022-08-24T17:04:35+5:302022-08-24T17:05:22+5:30
कुठलंही आंदोलन विनानेतृत्व होणार असेल तर ते भयानक असते. लोकांच्या मनातला हा राग असतो असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
मुंबई - मध्य रेल्वेवरएसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्यामुळे ठाणे, बदलापुरात सुरु झालेल्या आंदोलनाचं लोण आता मुंबईच्या प्रत्येक स्टेशनवर दिसणार आहे. एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्यामुळे सामान्य लोकलसाठी प्रवाशांना ताटकळत राहावं लागतंय. त्यामुळे त्यावर अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता रेल्वे प्रवाशांच्या या समस्येला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मध्य रेल्वेला सर्वसामान्य प्रवाशांबद्दल प्रेम राहिले नाही. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेतून येणारे उत्पन्न देशात सर्वाधिक आहेत. साध्या लोकल रद्द करून एसी लोकल चालवल्या जात आहेत. १० एसी ट्रेन ५७०० लोक जातात आणि साध्या लोकलमध्ये एका रेल्वेत २७०० लोकं जातात. पहिलं आंदोलन कळव्यात झालं आता हे आंदोलन मुंबईत पसरतंय. लोकांना एसी लोकल परवडत नाही. सर्वसामान्य प्रवाशांचा विचार रेल्वेला करावा लागेल असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत कुठलंही आंदोलन विनानेतृत्व होणार असेल तर ते भयानक असते. लोकांच्या मनातला हा राग असतो. राजकीय आंदोलन राजकीय अभिवेष मनात ठेऊन करतात. रेल्वेने लोकांच्या मनातील राग ओळखावा. ही परिस्थिती सुधारली नाही तर मुंबईच्या प्रत्येक स्टेशनवर आग पेटेल. मी मैदानात उतरलोय. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांकडून अपेक्षित नसलेला प्रतिसाद मिळतोय. आंदोलन करण्यासाठी मध्यमवर्गीय रस्त्यावर येत नाही. परंतु ते रस्त्यावर उतरत असतील तर अस्वस्थता किती आहे हे रेल्वेने लक्षात घेतलं पाहिजे असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाडांनी केले आहे.
एसी लोकलच्या विरोधात प्रवाशांचा संताप
रेल्वे प्रवाशांचा प्रवास गारेगार व्हावा यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल सुरु करण्यात आल्या. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एसी लोकलची संख्याही वाढवली जाणार आहे. आधीच मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या ६६ फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र वातानुकूलित लोकलचं तिकिट अधिक असल्याने प्रवाशांनी एसी लोकलकडे पाठच फिरवली आहे. इतकंच नाही तर एसी लोकलविरोधात प्रवाशांचा रोषही वाढत चालला आहे. सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करुन एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्याने प्रवाशांची नाराजी ओढवून घेतली आहे मध्य रेल्वेवरच्या बदलापूर रेल्वे स्थानकावर सामान्य लोकल रद्द करुन एसी लोकल चालवण्याने प्रवाशांचा उद्रेक झाल्याचं दिसून आले. संतापलेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घातला. ऐन गर्दीच्यावेळी सामान्य लोकल रद्द केल्याने प्रवासी चांगलेच भडकले. कळव्यातही प्रवाशांनी लोकल रोखली होती.