मुंबई : विश्वासदर्शक ठरावासाठी बोलविलेले अधिवेशन ज्या पद्धतीने बोलविले त्याने घटनेची पायमल्ली झाली असून हे अधिवेशन पूर्णत: नियमबाह्य असल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत केली. यावेळी भाजपचे सदस्य प्रचंड घोषणाबाजी करीत वेलमध्ये उतरले. विरोधकांचा आवाज हंगामी अध्यक्ष दाबत असल्याचा आरोप करीत भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला.कामकाज सुरू होताच हंगामी अध्यक्ष दिलिप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची अनुमती दिली. त्यावेळी त्यांनी एक मुद्दा मांडला. वळसे यांनी पुढील कामकाज पुकारले असता भाजपचे सदस्य संतप्त झाले आणि वेलमध्ये उतरून त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ‘नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी’ अशा घोषणा त्यांनी सुरू केल्या. शिवसेनेचे सदस्य बसूनच ‘जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत होते. विरोधकांच्या आक्रमकतेची झलक या पहिल्याच अधिवेशनात उध्दव ठाकरे यांना पहायला मिळाली. ‘तुमच्यासारख्या पक्षाकडून गोंधळाची अपेक्षा नाही’, अशी समज वळसे पाटील यांनी भाजप सदस्यांना दिली. मात्र वंदेमातरम नाही, मंत्र्यांची शपथही अवैध आहे, हे अधिवेशनच नियमबाह्य आहे, असे म्हणत संतप्त भाजप सदस्यांनी विधानसभेत सभात्याग केला.आम्ही रात्रीच्या अंधारात नाही तर लाखोंच्या समोर शपथ घेतली आणि होय! मी बाळासाहेब ठाकरे यांना साक्ष ठेऊन शपथ घेतली आणि त्यासाठी माझ्यावर कारवाई होणार असेल तर तिला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे, असे मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सरकारला पाठिंबा देताना जनसामान्यांचे प्रश्न सुटावेत, अशी अपेक्षा बविआचे हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केली.रात्री १ वाजताचा उल्लेख आणि...माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला रात्री एक वाजता निरोप आले की उद्या अधिवेशन आहे. आमच्या आमदारांना उपस्थित राहणे शक्य होऊ नये म्हणून असे केले, असे विधानसभेत सांगितले खरे पण त्यावर सभागृहात जोरदार हंशा पिकला. नंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, यांनी मध्यरात्री राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. स्वत:च्या पक्षाच्याही आमदारांना कळू दिले नाही आणि पहाटे कोणाला काही कळायच्या आत त्यांनी शपथही घेतली. आम्ही निदान दिवसाढवळ््या आमच्या सरकारचे बहुमत सिद्ध करत आहोत. त्यांनी आता तरी आम्हाला रात्रीच्या गोष्टी सांगू नयेत... मी नियम कायदे पाळणारा आहे, असे फडणवीस बोलताना म्हणाले, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोरदार हसून, टाळ््या वाजवत त्यांच्या या विधानाला दाद देत होते..!
विरोधकांची विधानसभेत प्रचंड घोषणाबाजी; मतदान न करताच विरोधकांनी केला सभात्याग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 5:40 AM