Join us  

महाअभिवादनासाठी चैत्यभूमीवर उसळला जनसागर

By admin | Published: December 06, 2015 9:37 AM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अलोट गर्दी उसळली आहे.

ऑनलाईन लोकमत 

 
मुंबई, दि. ६ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अलोट गर्दी उसळली आहे. राज्यासह देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येथे आले आहेत. दादर शिवाजीपार्कचा परिसर गर्दीने फुलून गेला आहे. चैत्यभूमीवर दाखल झालेल्या लाखो अनुयायांना सेवा-सुविधा पुरवण्यासाठी महापालिका, बेस्ट आणि विविध सेवाभावी संस्था सरसावल्या आहेत. अनुयायांना येथे आवश्यक सुविधा पुरविण्यात येत असून, चोख सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.
शनिवारी मोठय़ा संख्येने अनुयायी मुंबईत आले आहेत. कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून महापालिकेकडून येथे आपत्कालीन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिकेचे २00 अधिकारी आणि ६ हजार कर्मचारी येथे कार्यरत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन दलाद्वारे अग्निसुरक्षाविषयक बाबींची नियमितपणे तपासणी करण्यात आली आहे. 
खाद्यपदार्थ विक्रीसाठीचे ८0 स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. १ हजार ५२0 चौरस फूट इतक्या जागेवर माहिती कक्ष उभारण्यात आला आहे. शिवाजी पार्क परिसरात अतिदक्षता रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी २७0 ठिकाणी नळांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मोबाइल चार्ज करता यावा यासाठी १00 ठिकाणी चार्जिंग पॉइंट देण्यात आले आहेत. दादरच्या समुद्रकिनारी ४ बोटींसह जल सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. बाहेरगावावरून येणार्‍या अनुयायांसाठी कुर्ला टर्मिनस परिसरात नियंत्रण कक्ष, आरोग्य सेवा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.