Join us

मसिना रूग्णालय कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

By admin | Published: September 11, 2014 10:54 PM


मसिना रूग्णालय कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन
मुंबई : भायखळ्याच्या मसिना रूग्णालयातील सेवानिवृत्त होणार्‍या मेट्रनचा कार्यकाळ वाढवल्याने नाराज झालेल्या कर्मचार्‍यांनी गुरूवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. सुमारे १२५ परिचारिका या आंदोलनात सामील झाल्याने रूग्णांचे हाल झाले.
रूग्णालयातील अन्नमा नावाची एक मेट्रन सेवानिवृत्त होत असताना प्रशासनाने त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांनी वाढवल्याचा आरोप मुंबई लेबर युनियनने केला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे इतर परिचारिकांची पदोन्नती लांबणार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. परिणामी शुक्रवारीही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेने सांगितले.
प्रशासनाने तूर्तास निर्णय मागे घेतला नाही, तर शुक्रवारीही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव संजीव पुजारी यांनी सांगितले. शुक्रवारी आंदोलनात १२५ परिचारिकांसोबत इतर कर्मचारीही सामील होणार असल्याची माहिती पुजारी यांनी दिली.
रूग्णालयात ३०० खाटा असून रोज सुमारे ५० रूग्ण बाह्य रूग्ण विभाग (ओपीडी)साठी येतात. परिणामी परिचारिकांसोबत इतर कर्मचारीही कामबंद आंदोलनात सामील झाल्यास रूग्णसेवेस मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
.................