मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. ग्रँट रोड परिसरात लाकडाच्या गोदामास गुरुवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास लाकडाच्या गोदामाला आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळण्याचे काम अजूनही सुरूच आहे. स्थानिकांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १८ फायर इंजिन आणि २२ टँकर घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आग लागताच स्थानिकांनी बाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, याठिकाणी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पुढील प्रक्रियेसाठी मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच, लाकडाचे गोदाम या आगीत जळून खाक झाले आहे. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, रुग्णवाहिका, कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी देखील दाखल आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. बुधवारी (२४ जानेवारी) गोरेगाव पश्चिमेकडील इमारत आणि राम मंदिर परिसरातील एकमेव इंडस्ट्रियल आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर गुरुवारी (२५ जानेवारी) सांताक्रुझ पश्चिमेकडील एका इमारतीच्या तळघराला आग लागल्याची घटना घडली. या दोन्ही घटना ताज्या असतानाच, गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ग्रँट रोड परिसरातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग लागली.