मुंबई : चेंबूर रेल्वे स्थानकाच्या शेजारील झेरॉक्स गल्ली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जनता मार्केटला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे विभागात एकच खळबळ उडाली. ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या.
मार्केटमधील दहा कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जनता मार्केटमध्ये सर्व दुकाने ही टायपिंग सेंटर व झेरॉक्स सेंटरची असल्याने या आगीत अनेक संगणक, प्रिंटर व झेरॉक्स मशीन जळून खाक झाल्या आहेत. तसेच महत्त्वाची कागदपत्रे, फाइल्स व रोख रक्कम देखील आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहे. सकाळी आठच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलास यश आले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मी या मार्केटमध्ये दोन महिन्यांपूर्वी स्वतःचे दुकान घेतले होते. गेली अनेक वर्षे हे दुकान उघडण्याचे मी स्वप्न पाहिले होते. मात्र गुरुवारी लागलेल्या आगीत माझे दुकान संपूर्णपणे जळून खाक झाले आहे. माझ्या दुकानात झेरॉक्स मशीन, प्रिंटिंग मशीन, संगणक तसेच इतर साहित्य मिळून दीड लाखांचे सामान होते. याच प्रमाणे दहा हजार रोख रक्कम होती. या आगीमुळे स्वप्न तुटले आहे. आता पुन्हा हे दुकान कसे उभे करावे हा प्रश्न माझ्यासमोर पडला आहे.
- अर्शद शेख (दुकान क्र ४७ चे मालक, जनता मार्केट)