नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: भिवंडीत वीज वितरण करणाऱ्या टोरेंट पावरच्या मनमानी कारभारा विरोधात टोरंट पावर अत्याचार विरोधी जनसंघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी दुपारी तीव्र आंदोलन करण्यात आले. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. पुढे वंजरपट्टी नाका येथून प्रांत कार्यालायसमोरून महापालिका मुख्यालयाच्या समोर असलेल्या स्व.धर्मवीर आनंद दिघे चौकात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चामध्ये शेकडो नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या. विशेष म्हणजे शुक्रवारी सकाळपासून भिवंडीत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.या मुसळधार पावसातही या आंदोलनात शहरातील शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते. भिवंडी महापालिकेच्या समोर असलेल्या स्व.धर्मवीर आनंद दिघे चौकात झालेल्या जाहीर सभेत टोरंट पावरचा निषेध करण्यात आला.यावेळी टोरेंट पॉवरच्या विरोधात आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी करत टोरंट हटाव भिवंडी बचाव,नही चलेगी नही चलेगी टोरंट की दादागिरी नही चलेगी या व अशा घोषणा देत टोरंट पावर कंपनीस असलेला विरोध दर्शविला. यावेळी आंदोलकांच्या शिष्ठमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात दिले.
टोरंट कंपनीची शहर व ग्रामीण भागात मनमानी कारभार सुरु असून,जास्त वीज बिल आकाराने,सक्तीने वीज बिल वसूल करणे,वीज चोरी बाबत नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करणे या व अशा अनेक जाचाला कंटाळून भिवंडीत शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी एकत्र येत हा लढा उभारला असून आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढील काळात याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मोर्चाचे संयोजक ऍड.किरण चन्ने यांनी यावेळी दिला.
या आंदोलनादरम्यान शेलार ,मिठापाडा व भिवंडीतील काही ठिकाणी नागरिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन बंदला समर्थन दिले.सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात ही आंदोलनकर्ते सभेच्या ठिकाणी रस्त्यावर ठाण मांडून उभे होते.या आंदोलनामुळे शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.