मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
By admin | Published: July 17, 2014 01:51 AM2014-07-17T01:51:38+5:302014-07-17T01:51:38+5:30
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायन - पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ मध्यरात्री सहा तास वाहतूक ठप्प
नवी मुंबई : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायन - पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ मध्यरात्री सहा तास वाहतूक ठप्प झाली होती. इंदिरानगरमध्ये झोपडी वाहून गेली असून अनेक ठिकाणी वृक्ष कोसळणे व शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत.
सायन - पनवेल महामार्गावर हर्डिलीया कंपनीजवळ नैसर्गिक नाल्यातील पाणी मंगळवारी रात्री ८ च्या दरम्यान रोडवर आले. यामुळे या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा परिणाम पनवेलकडे जाणाऱ्या वाहतुकीवर झाला होता. सदर ठिकाणावरून सानपाडा सिग्नलपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ठाणे - बेलापूर रोडवरही चक्काजाम झाले होते. अखेर पोलिसांनी वाशीकडून येणारी वाहने पामबीचमार्गे वळवून वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला. रात्री २ वाजेपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सकाळी जेसीबीच्या सहाय्याने नाल्यावरील रोड खोदून पाण्याला वाट करून देण्यात आली.
शहरात दिवसभर अनेक ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी शॉर्टसर्किटचेही प्रकार झाले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. हार्बर मार्गावरील ट्रेनही उशिरा धावत असल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. इंदिरा नगर झोपडपट्टीच्या मागील बाजूला पाण्याच्या प्रवाहामुळे एक झोपडी वाहून गेली आहे. विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनी या ठिकाणी भेट देवून पाहणी केली व संरक्षक भिंत बांधण्यास विलंब होत असल्याविषयी नाराजी व्यक्त केली.