मुसळधार पावसाने जिल्ह्याची दाणादाण
By admin | Published: August 1, 2014 03:11 AM2014-08-01T03:11:34+5:302014-08-01T03:11:34+5:30
श्रावणात श्रावणसरींसह कोवळ्या उन्हाचा अनुभव मिळणे अपेक्षित आहे.
ठाणे : श्रावणात श्रावणसरींसह कोवळ्या उन्हाचा अनुभव मिळणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या चार दिवसांपासून अगदी याविरुद्ध मुसळधार पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यातील दैनंदिन जीवनमान पूर्णपणे कोलमडले आहे. शहरात मोठमोठ्या नाल्यांचा तर ग्रामीण भागात नद्यांचा पूर नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. यामुळे बहुतांशी गावांचा संपर्क तुटला आहे. याशिवाय, रस्ता खचल्यामुळे मुंबई-नाशिक महामार्ग तर नदी-नाल्यांचे पाणी रस्त्यांवर आल्यामुळे कल्याण-नगर महामार्गावरील वाहतूक दीर्घकाळ रखडली आहे.
भिवंडीतील ईदगाह झोपडपट्टीतील एक, मोहनेतील एक तर बापगाव येथेही एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला. वसई, मुरबाड, कल्याण, शहापूर, भिवंडी तालुक्यांतील नद्यांवरील अनेक पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूककोंडी झाली. ठाण्याचा प्रसिद्ध मासुंदा तलाव तर भिवंडीला पाणीपुरवठा करणारा वऱ्हाळादेवी तलाव ओव्हरफलो झाला आहे़ पावसामुळे सखल भागांत पाणी तुंबल्याने उपनगरीय वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती.
ठाणे शहरात १२ झाडे पडली असून पाच ठिकाणी पाणी साचले आहे. सावरकरनगर येथे पहाटेच्या सुमारास झाड पडून अवधेश सिंग, विद्यावती, सोनी, प्रीती आणि प्रिया या एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत.
शहापूर तालुक्यातील आवरेगावातील सीताबाई वाघ या आदिवासी महिलेचे घर पडले आहे. अवघ्या चार वर्षांपूर्वी घरकुल योजनेत बांधण्यात आलेल्या या घरांचे बांधकाम निष्कृट दर्जाचे असल्यामुळे ते पडले. वासिंद रेल्वे पूल पाण्याखाली गेल्यामुळे प्रवाशांना पूर्व-पश्चिम जाण्याची समस्या उद्भवली आहे. उल्हास नदीला पूर असल्यामुळे म्हारळ, वरप, कांबा आदी परिसरांत या नदीचे पाणी आल्यामुळे नगर महामार्गावरील वाहतूक दीर्घकाळ थांबवण्यात आली. उल्हास नदीसह काळू, शाई, भातसा, वालधुनी आदी महत्त्वाच्या नद्या या मुसळधार पावसामुळे चार दिवसांपासून दुथडी भरून वाहत आहेत. (प्रतिनिधी)