Join us

गुरुजी, माझे डोळे आलेत हो; आज शाळेला येणार नाही! चालेल ना...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 10:18 AM

पटसंख्येच्या तुलनेमध्ये गैरहजेरीचे प्रमाण वाढले 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्वत्र डोळ्यांची साथ सुरू आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत डोळे आल्याचे रुग्ण सापडत आहेत. संसर्गजन्य आजार असल्याने एकमेकांच्या संपर्कात आल्यास लागण होत आहे. शाळांमध्ये हा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शाळेतील एकूण पटसंख्येच्या तुलनेत गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे.

शालेय विद्यार्थी एकत्र येत असल्याने संपर्कामुळे संसर्ग वाढतो. पालकांनीही मुलांचे डोळे येण्यापूर्वीच योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना डोळे आल्यास शाळेत येऊ नका, अशा सूचना करीत आहेत. जिल्हा परिषद असो वा खासगी शाळांमध्ये सध्या वर्गातील उपस्थिती घटलेली आहे. डोळे आल्याने पाल्य शाळेत येणार नसल्याचे पालक सांगतात. डोळे आल्यास मुले शाळेत आली नाही, तर संसर्ग लवकर आटोक्यात येऊ शकतो. 

लहान मुलांमध्ये डोळ्याची साथहवामानातील बदलामुळे डोळे येण्याची साथ वाढू लागली आहे. शाळेत किंवा शिकवणीच्या वर्गाला जात असल्याने एकमेकांचा संपर्क वाढतो व संसर्ग वाढतो. डोळे आल्यास एकमेकांच्या संपर्कात येण्याऐवजी दूर राहिल्यास साथ रोखण्यास मदत होईल. 

लक्षणे डोळे हलके लाल होऊ लागतात. डोळ्यातून पाणी यायला लागते. खाज येऊ लागते. डोळ्यात थोडा चिकटपणा येतो. डोळ्यात वारंवार खाज येते.

शाळेतील उपस्थिती घटली डोळे आल्याची साथ गंभीर नसली तरी गावोगावी रुग्ण सापडत आहेत. शालेय विद्यार्थी डोळे आल्याने शाळेत येत नाहीत. त्यामुळे वर्गातील उपस्थिती घटली आहे.

डोळे आल्यास शाळेत पाठवू नकाडोळे आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास हा संसर्ग वाढू शकतो. पालकांनीही मुलांचा अभ्यास बुडतो म्हणून शाळेत पाठविण्यापेक्षा घरी ठेवणे सुरक्षित राहील. 

डोळ्याचा हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी आजाराची लक्षणे आढळल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात, दवाखान्यात,आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावा. कपडे, टॉवेल आणि चादरी स्वतंत्र ठेवाव्यात, जेणेकरून रोगाचा प्रसार कुटुंबातील इतर सदस्यांना होणार नाही. डोळ्याला वारंवार हात लावू नये, तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे अशी माहिती नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. ऋषी खडपे यांनी दिली आहे.