रक्तचंदन तस्करीचा मास्टरमाईंड महम्मद अली
By Admin | Published: December 7, 2014 01:40 AM2014-12-07T01:40:13+5:302014-12-07T01:40:13+5:30
तब्बल नऊ कोटींच्या रक्तचंदनाच्या तस्करीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने तेलमाफिया महम्मद अली याला गजाआड केले आहे.
मुंबई : तब्बल नऊ कोटींच्या रक्तचंदनाच्या तस्करीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने तेलमाफिया महम्मद अली याला गजाआड केले आहे. या तस्करीमागील मास्टरमाईंड महम्मद अली हाच असल्याची खात्री झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे गुन्हे शाखेतील सूत्रंकडून समजते. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
भारतीय तटरक्षक दल आणि अंमलबजावणी संचलनालयाने या यंत्रणांनी काल मुंबईजवळच्या समुद्रात दोन नौकांवर छापा टाकून 20 तस्करांना अटक केली आणि त्यांच्याजवळील 20 टन रक्तचंदन जप्त केले होते. गुजरातमधील वेरावळ येथून दुबईला निघालेल्या अल मारवा 10 नावाच्या गलबतावर हे रक्तचंदन चढविण्याचे काम सरू होते. तेव्हा या यंत्रणांनी छापा घालून ते जप्त केले. सोबत या तस्करीत सहभागी असलेल्या 16 खलाशांसह एकूण 18 जणांना गजाआड केले. त्यांच्या चौकशीत महम्मद अलीचे नाव समोर आले. अल मारवा गलबतातून रक्तचंदन दुबईला धाडण्याचा कट महोम्मद अलीचाच होता.
व्यावसायिक जहाजांमधील इंधन किंवा भंगाराच्या तस्करीर्पयत महोम्मद अलीची मजल होती. मात्र रक्तचंदनाच्या तस्करीत पहिल्यांदाच त्याचे नाव समोर आल्याचे गुन्हे शाखाही अवाक् झाल्याची माहिती मिळते. (प्रतिनिधी)
अली म्हणजे कुत्र्याचे शेपूट
माफिया म्हणून ओळख असलेला महम्मद अली प्रतिस्पर्धी चांद मदारच्या हत्येप्रकरणी गजाआड होता. गुन्हे शाखेनेच त्याला अटक केली होती. या गुन्हयाला मोक्का लागलेला असताना अली काही दिवसांपूर्वी वैद्यकीय कारणो पुढे करून जामिनावर सुटला. मात्र या काळात त्याने रक्तचंदनाच्या तस्करी सुरू केली.