कांदिवली बनावट लसीकरण; गुन्ह्यातील भूमिका पोलीस पडताळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवलीतील बनावट लसीकरणातील मास्टरमाइंड डॉ. मनीष त्रिपाठीला बुधवारी कांदिवली पोलिसांनी दिंडोशी सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, डाॅ. त्रिपाठीला पोलिसांनी हातकडी घालून कोर्टरूमपर्यंत नेल्याने त्याचे वकील ॲड. आदिल खत्री यांनी आक्षेप घेत याबाबत न्यायालयात अर्ज दिला आहे.
कांदिवली पोलिसांनी बुधवारी दिंडोशी सत्र न्यायालयात डॉ. त्रिपाठीला हजर केले. त्याची लसीकरणातील नेमकी भूमिका काय, याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे त्रिपाठीचा ताबा मागितला. त्यानुसार न्यायालयाने त्याला ४ जुलै, २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले.
कांदिवली पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांनी डाॅ. त्रिपाठीने आत्मसमर्पण केले हाेते. कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये ३० मे, २०२१ रोजी बनावट लसीकरण करण्यात आले होते. डॉ. त्रिपाठीच्या अटकेमुळे आता या बनावट लसीकरणातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत या प्रकरणी कांदिवली, बोरीवलीसह खार, वर्सोवा, बांगुरनगर, भोईवाड्यातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
* ६१८ जणांचे बनावट लसीकरण; समता नगरमध्येही गुन्हा दाखल
समतानगर परिसरात चार हिरे कंपन्यांच्या ६१८ जणांना पालिकेची परवानगी न घेता बनावट लस देण्यात आली. याप्रकरणी पालिकेचे अधिकारी बनसोडे यांनी समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार बुधवारी याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समता नगर पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक आनंदराव हाके यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यातही डॉ. मनीष त्रिपाठी, डॉ. अनुराग, रोशनी पटेल आणि एक स्टाफ मुख्य आरोपी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
.........................................................................................................................