कांदिवली बोगस लसीकरण; दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवली बोगस लसीकरण प्रकरणातील मास्टरमाइंड डॉ. मनीष त्रिपाठी याचा जामीन सोमवारी दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानुसार त्याने मंगळवारी आत्मसमर्पण करण्याचे ठरविल्याची माहिती त्याचे वकील ॲड. आदिल खत्री यांनी दिली.
ॲड. खत्री यांनी डॉ. त्रिपाठीच्या वतीने आत्मसमर्पण अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. ‘माझे अशील डॉ. त्रिपाठी हे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास दंडाधिकारी अथवा परिमंडळ अकाराचे पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयात आत्मसमर्पण करणार आहेत’, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
लसीकरण शिबिर आयोजित करताना स्थानिक पालिका विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये ३० मे, २०२१ रोजी लसीकरण शिबिरासाठी सोसायटीने ती घेतली नव्हती, तसेच माझे अशील डॉ. त्रिपाठी यांची तक्रारदाराशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भेट झालेली नाही. चारकोपच्या शिवम रुग्णालयाला वाचविण्यासाठी त्याचा कर्मचारी महेंद्र सिंह याने सोसायटीची दिशाभूल केल्याने हा गोंधळ झाला असून यात डॉ. त्रिपाठी यांना बळीचा बकरा केला जात आहे, असा आराेप करत ॲड. खत्री यांनी मंगळवारी दिंडोशी सत्र न्यायालयात डॉ. त्रिपाठीचा जामीन अर्ज दाखल केला होता. पोलिसांना तपासात डॉ. त्रिपाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून त्यांचा पासपोर्टही वर्ग करण्यास ते तयार असल्याचे ॲड. खत्री यांनी सत्र न्यायालयाला सांगितले होते. मात्र, सत्र न्यायालयाने डाॅ. त्रिपाठीचा जामीन अर्ज फेटाळला.
.................................................................