डिसॅबिलिटी कम्युनिकेशनचा पदव्युत्तर अभ्यासक्रम
By admin | Published: January 14, 2017 07:16 AM2017-01-14T07:16:22+5:302017-01-14T07:16:22+5:30
दिव्यांग व्यक्तींना अभ्यास करताना अनेक अडचणी येत असतात. समाजात वावरत असताना अनेकदा दिव्यांग व्यक्तींना संवाद साधता
मुंबई : दिव्यांग व्यक्तींना अभ्यास करताना अनेक अडचणी येत असतात. समाजात वावरत असताना अनेकदा दिव्यांग व्यक्तींना संवाद साधता येत नाही. त्यामुळे अनेक अडचणी येतात. दिव्यांग विद्यार्थ्यांची कौशल्यवृद्धी आणि सुगम्यता साधण्यासाठी डिसॅबिलिटी कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आल्याचे मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि संज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. संजय रानडे यांनी सांगितले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय दिव्यांग संज्ञापन (डिसॅबिलिटी कम्युनिकेशन) परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता व संज्ञापन विभाग, अली यावर जंग संस्था आणि स्वीडनच्या जॉनकोपिंग विद्यापीठाच्या संशोधन (संज्ञापन, संस्कृती व विविधता) विभागाच्या सहकार्याने ही परिषद पार पाडली.
या परिषदेत एकविसाव्या शतकातील आव्हाने आणि दृष्टिकोन याविषयी चर्चा करण्यात आली. या परिषदेत बोलताना, मुंबई विद्यापीठात डिसॅबिलिटी कम्युनिकेशनचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या परिषदेत सिद्धांतीय क्षेत्र, संस्कृती आणि तंत्रज्ञान या विषयांवर निबंध सादर करण्यात आले. परिषदेचे उद्दिष्ट साधत दिव्यांग संज्ञापन या विषयातील नवीन उच्च पदवी अभ्यासक्रमाविषयी चर्चा आणि निष्कर्षदेखील मांडण्यात आले. स्वीडन, फिनलंड, मॉरिशस, यू. के., बांगलादेश येथील प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित होते. (प्रतिनिधी)