माता रमाई यांनी अपार कष्ट करून डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला मोकळी वाट करून दिली :ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी
By मनोहर कुंभेजकर | Published: February 8, 2024 05:17 PM2024-02-08T17:17:40+5:302024-02-08T17:18:25+5:30
माता रमाई यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड घाव सोसून संसाराचा गाडा चालवला.
मनोहर कुंभेजकर, मुंबई : माता रमाई यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड घाव सोसून संसाराचा गाडा चालवला. मोठे कुटुंब व सतत आर्थिक अडचणींमुळे पडेल ते काम करण्याची जिद्द माता रमाई यांनी जोपासली. त्यांनी केलेल्या अपार कष्टांमुळेच डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला मोकळी वाट करून दिली" असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या प्रतिमा जोशी यांनी काल अंधेरीत केले. त्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, चार बंगला, अंधेरी (प.)येथे आयोजिलेल्या माता रमाई यांच्या १२६ व्या जयंती प्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव होते.
ज्येष्ठ साहित्यिक योगीराज बागुल प्रमुख वक्ते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सान्निध्य लाभलेल्या ९० वर्षीय शकुंतला गुप्ते आवर्जून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अर्चना आणि श्रध्दा मोरे यांनी माता रमाईंवरील गीते सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड व माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रतिमा जोशी पुढे म्हणाल्या की, " सावित्रीबाई फुले व माता रमाई यांचे कार्य हे एका समुहाच्या प्रगतीसाठी होते. त्या काळात या मातांनी जो संघर्ष केला त्यामुळे आज त्या असंख्य स्त्रियांच्या माता झाल्या आहेत. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन आजच्या स्त्रियांनी वाटचाल केली पाहिजे. येणारे दिवस अतिशय त्रासदायक असल्याने त्यांनी आज सतर्क राहिले पाहिजे" असे आवाहन त्यांनी केले.
सुरूवातीला प्रा. पुष्पा धाकतोडे यांनी संस्थेचा व संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमांचा परिचय करून दिला. मिनल बच्छाव, तारा बोदवडे व रजनी वानखेडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सगळ्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. विशेषतः उपस्थित राहिलेल्या शकुंतला गुप्ते यांनी बाबासाहेब आणि त्यांचे वडील कमलाकांत चित्रे यांच्या ३२ वर्षांच्या सहवासातील अविस्मरणीय आठवणींचा पट मांडला. "बाबासाहेब सगळ्यांशी कायम मैत्रीने वागत, नेहमी विचारपूस करत. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या कायम कार्यमग्नतेमुळे बाबासाहेब फार मोठे व्यक्ती आहेत याची जाणीव आम्हांला लहानपणीच झालेली होती. डॉ.बाबासाहेबांच्या अनमोल आठवणी ९० वर्षांच्या शकुंतला गुप्तेंकडून ऐकून तृप्त होऊन उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
प्रमुख वक्ते योगीराज बागुल म्हणाले की, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सान्निध्यात राहिलेल्यांचा शोध घेत त्या शब्दबध्द करण्याची किमया साधली आहे. बाबासाहेब बॅरिस्टर तर रमाबाईंना अक्षरओळखही नव्हती. मात्र तत्कालीन ओव्यांमध्ये रमाईंचा त्याग, बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत संसारगाडा चालवणे यातून रमाईंची महती सांगितली. बाबासाहेब आणि त्यांचे विश्वासू सहकारी कमलाकांत चित्रे यांची दुर्मिळ २५० पत्रे बागुल यांनी मिळवली आहेत. या पत्रांचा संदर्भ देत त्यांनी तत्कालीन काळ व बाबासाहेबांच्या जीवनातील स्त्रियांचे योगदान यावर भाष्य केले.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नितीन सोनावणे यांच्या पत्नी दिवंगत सविता सोनावणे यांना मूक श्रध्दांजली वाहण्यात आली.
शेवटी अध्यक्ष विजय जाधव यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी संस्थेचे सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव, कोषाध्यक्ष सदाशिव गांगुर्डे, विश्वस्त नीता हरिनामे, सुनिल वाघ, संजय जाधव, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष सरोज बिसुरे, मा. नगरसेविका ज्योत्स्ना दिघे, शिवसेना उपविभागप्रमुख (उबाठा) राजेश शेट्ये इ. मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लता परूळेकर, छाया बनसोडे, अंजना गवळे, प्रमोदिनी कांबळे, ज्योती बोरकर, सुमन रणशूर, शलाका मखीजा, वैशाली बच्छाव, करूणा मेश्राम यांनी विशेष परिश्रम घेतले.