मुंबई : मातंग समाजाला अनुसूचित जमातीमध्ये स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी करीत अखिल भारतीय मातंग संघ आणि भारतीय बहुजन आघाडीने बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. अनुसूचित जमातीत अ, ब, क, ड वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के आरक्षण देण्याची मागणी करीत दोन्ही संघटनांचे अध्यक्ष १२ मार्चपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसणार आहेत.अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले आणि भारतीय बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा कुसुम गोपले १ हजार २१३ दिवसांपासून आझाद मैदानात धरणे देत आहेत. दरम्यान, शेकडो कार्यकर्त्यांसह मोर्चे आणि निदर्शने करून त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला. मात्र आघाडी सरकारने संघटनेसोबत चर्चा करून केवळ वेळकाढूपणा केला. त्या वेळी विरोधी बाकावर असताना सुधीर मुनगंटीवर, विनोद तावडे आणि एकनाथ खडसे या भाजपा नेत्यांनी सत्ता आल्यावर मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासनही दिल्याचा गोपले यांचा दावा आहे. मात्र सत्तेवर आल्यानंतर भाजपा नेत्यांना आश्वासनाचा विसर पडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
आरक्षणासाठी मातंग समाज आक्रमक
By admin | Published: February 02, 2015 2:58 AM