मातंग समाजाचे खंबीर नेतृत्व हरपले

By Admin | Published: August 28, 2016 02:44 AM2016-08-28T02:44:57+5:302016-08-28T02:44:57+5:30

दलितांमधील अतिमागास म्हणून ओळख असलेल्या मातंग समाजाला राजकीय पटलावर आणणाऱ्या बाबासाहेब गोपले या खंबीर नेतृत्वाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने मातंग

Matang society's steadfast leadership failed | मातंग समाजाचे खंबीर नेतृत्व हरपले

मातंग समाजाचे खंबीर नेतृत्व हरपले

googlenewsNext

- चेतन ननावरे

दलितांमधील अतिमागास म्हणून ओळख असलेल्या मातंग समाजाला राजकीय पटलावर आणणाऱ्या बाबासाहेब गोपले या खंबीर नेतृत्वाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने मातंग समाजाला मोठा धक्का बसला आहे. अखेरच्या श्वासापर्यंत स्वतंत्र आरक्षणासाठी लढणाऱ्या गोपले यांच्या पश्चात अखिल भारतीय मातंग संघासमोर हा लढा तडीस नेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

मातंग समाजाला जागृत करणारे अण्णाभाऊ साठे हे गोपले यांचे आदर्श होते. त्यांच्या प्रेरणेतूनच गोपले यांनी मातंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढली. १९८० साली अखिल भारतीय मातंग संघाची स्थापना करत त्यांनी मातंग समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली. त्यासाठी मातंग संघाने मोर्चे, धरणे, उपोषण अशा विविध आंदोलनांतून सरकारला सळो की पळो करून सोडले. त्यांच्या आंदोलनाची दखल घेतच शासनाला १९८५ साली अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी लागली. महत्त्वाची बाब म्हणजे केवळ लढा देऊन न थांबता गोपले यांनी या महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारत समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले.
महामंडळाच्या अध्यक्षपदामुळे गोपले यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळाला होता. मात्र लाल दिव्याची गाडी मिळाल्यानंतरही त्यांच्यातील सामान्य कार्यकर्ता जिवंत राहिला. मातंग समाजातील तब्बल एक लाख कुटुंबांना गोपले यांनी मुंबईत निवारा मिळवून दिला. खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत अशिक्षणामुळे विखुरलेल्या मातंगांना एकवटवण्याचे महत्त्वाचे काम गोपले यांनी केले. अनुसूचित जातींमध्ये अतिमागास असल्याने अ, ब, क, ड वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसाठी ते गेल्या काही महिन्यांपासून लढत होते. त्यांच्या उभ्या आयुष्यभराच्या लढाईत त्यांची पत्नी कुसुमताई गोपले यांची मोलाची साथ मिळाली. पदावर असतानाच नव्हे, तर त्यांच्या अखेरच्या आंदोलनापर्यंत कुसुमताई त्यांच्या सोबत होत्या. एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतरही गोपले यांना सावरण्याचे काम कुसुमताई यांनीच केले. परिणामी गोपले यांच्या मृत्यूनंतर समाजाच्या नेतृत्वाची जबाबदारी कुसुमताई यांच्या खांद्यावर आली आहे.
त्यांचे स्वप्न पूर्ण करणार
मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, मातंग बांधवांना अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळावे, यासाठी गोपले यांनी २४ सप्टेंबर रोजी आझाद मैदानात धडक मोर्चाची हाक दिली होती. त्यांच्या अखेरच्या आंदोलनाचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व कुसुमताई गोपले करणार आहेत.
दखल घेणार का?
आघाडी सरकारच्या काळात मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, म्हणून गोपले यांनी बेमुदत धरणे सुरू केले होते. विरोधी पक्षात असताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांनी त्यांना स्वतंत्र आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर नेत्यांना आणि पक्षाला आश्वासनाचा विसर पडला होता. काहीच महिन्यांपूर्वी गोपले यांच्या आंदोलनाची दखल घेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गोपले यांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घडवली. त्यामुळे गोपले यांचे आंदोलन यशस्वी होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे त्यांच्या पश्चात तरी सरकार आंदोलनाची दखल घेऊन मागण्या पूर्ण करणार का, असा सवाल आहे.

सर्वमान्य नेता हरपला
मातंग समाजासाठी लढणाऱ्या गोपले यांची ओळख सर्वमान्य नेता म्हणून होती. त्यामुळेच त्यांच्या अंत्यविधीला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री रमेश बागवे, विजय गिरकर, बाळासाहेब उमप अशा विविध पक्षांचे आणि संघटनांचे नेते उपस्थित होते. शासनानेही त्यांचे नेतृत्व मान्य करत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

Web Title: Matang society's steadfast leadership failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.