ठाणे : दिवा गावात मागील कित्येक महिन्यांपासून पाणीटंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात वारंवार आंदोलने करूनही पालिकाही त्यांना दाद देत नाही. परंतु, पुन्हा एकदा पालिकेला जाग यावी, या उद्देशाने बुधवारी येथील रहिवाशांनी मटका फोडो आंदोलन करण्याचा निश्चय मनसेच्या माध्यमातून केला होता. परंतु, मटके न फोडताच हे आंदोलन दिवा गाव ते भारत गिअर कंपनीच्या दरम्यान करण्यात आले.मनसेने पाणीटंचाईविरोधात नागरिक मोठ्या संख्येने ‘मटका फोडो’ आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. पाणीटंचाईची समस्या पाहता या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक सामील होणार असल्याचा अंदाज घेऊन पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनाच्या निमित्ताने भारत गिअर कंपनीच्या परिसरात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न लक्षात घेऊन पोलिसांनी त्यापूर्वीच तो अर्ध्या रस्त्यात थांबविला. विशेष म्हणजे या वेळी ‘मटका फोडो’ आंदोलनाचा इशारा देण्यात आला असला तरी मोर्चात कुठेही मटका घेतलेल्या महिलांच नव्हत्या. या वेळी सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव, स्थानिक नगरसेवक शैलेश पाटील, उपाध्यक्ष रवींद्र मोरे आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. (प्रतिनिधी)
मनसेच्या पाणी आंदोलनाचा मटका दिव्यात फुटलाच नाही
By admin | Published: July 02, 2015 10:35 PM