२२ व्या आठवड्यात प्रसूती : जन्मत:च विविध आव्हानांशी झुंज देणारा निर्वाण आला घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 03:09 AM2017-09-24T03:09:01+5:302017-09-24T03:09:21+5:30
वांद्रे येथील रहिवासी असलेल्या असलेल्या रितिका बजाज यांची, सांताकु्रझ येथील रुग्णालयात अवघ्या २२व्या आठवड्यात, १२ मे रोजी प्रसूती करण्यात आली. या वेळी त्यांनी मुलाला जन्म दिला.
मुंबई : वांद्रे येथील रहिवासी असलेल्या असलेल्या रितिका बजाज यांची, सांताकु्रझ येथील रुग्णालयात अवघ्या २२व्या आठवड्यात, १२ मे रोजी प्रसूती करण्यात आली. या वेळी त्यांनी मुलाला जन्म दिला. जन्मत:च विविध आव्हानांशी झुंज देणारा चिमुकला निर्वाण, त्याच्या घरी गेला. निर्वाणचे पालक या रुग्णालयातील १४ डॉक्टर्स आणि ५० नर्सिंग कर्मचाºयांच्या चमूने रात्रीचा दिवस करून, निर्वाणची काळजी घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील हे आव्हान पेलले आहे.
जन्माच्या वेळी त्याचे वजन ६१० ग्रॅम होते, डोक्याचा आकार २२ सेंटिमीटर होता आणि लांबी केवळ ३२ सेंटिमीटर होती. या परिस्थितीवर मात करून, जिवंत राहिलेला हा सर्वांत चिमुकला जीव असल्याचा रुग्णालय प्रशासनाचा दावा आहे. रितिका या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, प्रसूती कक्षात नेल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्यांची प्रसूती झाली. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत जन्मल्यानंतर, पहिल्या १० मिनिटांमध्ये कुशल तज्ज्ञांच्या टीमतर्फे निर्वाणची वेळेवर काळजी घेण्यात आली. त्यानंतर, त्वरित निर्वाणला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. या विभागात गेले चार महिने निर्वाणच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते.
याविषयी डॉ. भूपेंद्र अवस्ती म्हणाले, जन्मापासूनच निर्वाणची फुप्फुसे अपरिपक्व होती. त्यामुळे प्रसूतिगृहापासूनच त्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासली होती. त्याला १२ आठवडे श्वसनासाठी मदत द्यावी लागली. त्यापैकी ६ आठवडे तो व्हेंटिलेटरवर होता. त्याच्या फुप्फुसांचे प्रसरण व्हावे, यासाठी त्याच्या श्वसननलिकेत (ब्रिदिंग ट्युब) पृष्ठक्रियाकारी (सरफंक्टन्ट) इंजक्शन्स समाविष्ट करण्यात आली होती. त्याला न्यूमोथोरॅक्स आणि मेंदूतील रक्तस्त्राव झाला होता, पण त्यावरही त्याने मात केली. आता निर्वाण सुदृढ होऊन आणि आनंदाने घरी गेला आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. आता त्याचे वजन ३.७२ किलो आहे, डोक्याचा आकार ३४ सेंटिमीटर आहे आणि लांबी ५० सेंटिमीटर आहे.