शिवसेनेसाठी आता महेता मध्यस्थ!

By admin | Published: August 5, 2015 02:14 AM2015-08-05T02:14:46+5:302015-08-05T02:14:46+5:30

शिवसेनेसोबतचे मतभेद दूर करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर मध्यस्थाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविली आहे.

Mateta arbitrator for Shiv Sena! | शिवसेनेसाठी आता महेता मध्यस्थ!

शिवसेनेसाठी आता महेता मध्यस्थ!

Next

अतुल कुलकर्णी , मुंबई
शिवसेनेसोबतचे मतभेद दूर करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर मध्यस्थाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वत: महेता ठाकरेंना जाऊन भेट देऊन आले.
शिवसेना आणि भाजपात म्हणावे तसे आलबेल नाही. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवून भाजपाला धडा शिकवण्याची तयारी सेनेने सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाची ही चाल बोलकी आहे. महेतांवर ही जबाबदारी दिली जात असताना तिकडे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र कोल्हापुरात शिवसेनेची फारशी ताकद नसल्याचे विधान केल्यामुळे जिल्ह्यातले सेनेचे आमदार चिडलेले आहेत. पक्षाचे कोल्हापूर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, कोल्हापुरात ताराराणी पक्षासोबत जाण्याचा निर्णय चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. तो पक्ष काँग्रेसशी जवळीक असणारा आहे. ताराराणीची साथ सोडावी लागेल तरच आम्ही भाजपासोबत जाऊ. केंद्रात आणि राज्यात एकत्र असताना कोल्हापुरात काय करायचे याचा निर्णय भाजपाने घ्यायचा आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई महापालिकेच्या निवडणुका होण्याआधी कोल्हापुरात भाजपाला ताकद दाखवून द्यायची आणि लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुका लढवायच्या. कोल्हापूरचे हे चित्र असताना शिवसेना वेळोवेळी सरकारच्या धोरणांवर, भूमिकेवर टीका करत असते. पक्षाच्या मुखपत्रातून अनेकदा मुख्यमंत्र्यांनादेखील चिमटे, किंवा जाहीर सल्ले दिले जातात. हे टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत महेतांकडे ही जबाबदारी सोपवली. त्यांचे ठाकरेंसोबतचे संबंध चांगले आहेत. यापुढे महेता दर १०-१२ दिवसांनी ठाकरेंची भेट घेत राहतील. त्यांचे म्हणणे, तक्रारी ऐकून संबंधितांशी चर्चा करतील. पक्षाचे जे काही म्हणणे असेल तेदेखील ठाकरेंना सांगतील.

Web Title: Mateta arbitrator for Shiv Sena!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.