मुंबई : गणित चुकले म्हणून आठवीच्या विद्यार्थ्याला काठीने चोपल्याचा धक्कादायक प्रकार ट्रॉम्बेमध्ये उघडकीस आला आहे. यामध्ये मुलाच्या हात, पायाला सूज आली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी खासगी शिकवणी घेणारा शिक्षक प्रदीप भंडारी (३६) याला अटक केली आहे.
मानखुर्द स्टेशन रोड येथील सिद्धार्थ चौकात ४७ वर्षीय तक्रारदार राहतात. त्यांना दोन मुले आहेत. यापैकी आठवी इयत्तेत शिकणाऱ्या रोहनला (१४, नावात बदल) त्यांनी दोन महिन्यांपूर्वी भंडारी याच्याकडे खासगी शिकवणीसाठी पाठविले. १२ तारखेला तो नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी गेला. तेथे आरोपी शिक्षकाने त्याला गणित विचारले. पण त्याने चुकीचे उत्तर दिले. याच रागात भंडारीने त्याला काठीने मारहाण केली. त्याला दोन तास बसवून ठेवले.
नेहमी चार वाजेपर्यंत घरी येणारा रोहन ६ वाजले तरी परतला नाही, म्हणून कुटुंबीयांनी भंडारीकडे विचारणा केली. तेव्हा जास्तीचा अभ्यास असल्याचे सांगण्यात आले. पण साडेसहाच्या दरम्यान रोहनने रडत रडत घर गाठले. तेव्हा मुलाच्या हात आणि पायाला आलेली सूज पाहून आईलाही धक्का बसला. त्याला याबाबत विचारणा केली असता, त्याने घटनाक्रम आईला सांगितला. याबाबत पत्नीकडून समजताच, तक्रारदार यांनी घर गाठत मुलाला रुग्णालयात नेले. या प्रकारामुळे रोहनला शाळेलाही जाण्याची भीती वाटत आहे.
तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी भंडारीविरुद्ध गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश साळवी यांनी दिली.शिक्षकावर कडक कारवाई व्हावी...मुलांना समजून सांगणे गरजेचे आहे. त्यांना अशी मारहाण करणे चुकीचे आहे. या मारहाणीमुळे त्याला मानसिक धक्का बसला असून तो खूप घाबरलेला आहे. अजूनही तो त्याच भीतीत आहे. त्यामुळे अशा निर्दयी शिक्षकांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया जखमी मुलाच्या वडिलांनी दिली