मुंबई : अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सचिव अविनाश रामिष्टे (३७) यांना गुरुवारी पुन्हा जीवे मारण्याच्या धमकीच्या पत्राबरोबरच बंदुकीची गोळी आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.कर्नाक बंदर परिसरात रामिष्टे यांचे कार्यालय आहे. २०१०पासून त्यांना निनावी फोनद्वारे धमक्या येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे २०१३पासून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले. २०१६मध्ये पेण येथे कामानिमित्त गेले असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. यात ते थोडक्यात बचावले होते. अशातच गुरुवारी सकाळी त्यांच्या कर्नाक बंदर येथील कार्यालयात निनावी पत्र आल्याने खळबळ उडाली. ‘तुझा शहाणपणा अजून कमी झालेला नाही. पत्राबरोबर गोळी पाठविलेली आहे आहे. बघून घे. जास्त उडत राहिलास तर हीच गोळी आरपार जाऊ शकते. एकदा वाचलात. परत वाचणार नाहीस,’ असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यांचे सहकारी तुषार वाडिये यांच्या तक्रारीवरून एमआरए मार्ग पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्टे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:41 AM