मुंबई: माथाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतीने बंदची घोषणा करण्यात आली आहे. पणन विभागानं 25 ऑक्टोबरला आणि कामगार विभागानं 28, 29 ऑक्टोबर आणि 20 नोव्हेंबर काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती द्यावी, अशी संघटनेची मागणी आहे. याशिवाय माथाडी, सुरक्षा कामगारांच्या प्रश्नांची सरकारनं सोडवणूक करावी, अशीदेखील मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. यासाठी संघटनेनं आज लाक्षणिक बंद पुकारला होता. मात्र आता संघटनेकडून बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली आहे.
माथाडी संघटना कृती समितीच्यावतीनं महाराष्ट्रातील तमाम माथाडी, सुरक्षा रक्षक कामगार व व्यापारी वर्गाच्या न्याय हक्कासाठी आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण सुरू होतं. मात्र सरकारने न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व नियमन) अधिनियम – १९६३ यात आणखी सुधारणा करण्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढलेला अध्यादेश क्र.२४ ला विधीमंडळात गोंधळात मंजुरी दिल्याचं समजल्यानं बेमुदत बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या पणन, कामगार व अन्य विभागांकडून माथाडी, सुरक्षा रक्षक कामगारांवर अन्याय करणारे निर्णय एकतर्फी घेण्यात आले. त्यांना रोखण्यासाठी महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीनं डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली एका कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी, वाहतूक आणि जनरल कामगार युनियनचे मा. आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, अखिल भारतीय माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अविनाश रामिष्टे, चंद्रकांत शेवाळे, महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे बळवंतराव पवार, प्रकाश पाटील, राजकुमार घायाळ, अखिल महाराष्ट्र माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे पोपटशेठ पाटील, प्रकाशदादा पाटील, राष्ट्रवादी सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या मंदा भोसले, हणमंतराव सुरवशे, श्री कापड बाजार मराठा कामगार युनियनचे जयवतंराव पिसाळ, श्री. दत्तात्रय कृष्णा जगताप या प्रतिनिधींचा समावेश आहे.