Join us

मुंबईत माथाडी कामगारांचा मोर्चा, एपीएमसी मार्केट बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 10:42 AM

मुंबईत आज माथाडी कामगारांचा मोर्चा निघणार आहे. मस्जिद बंदर ते विधान भवन असा हा मोर्चा असणार आहे. यासाठी नवी मुंबईतून सीएसटीएम स्थानकाकडे अनेक माथाडी कामगार रवाना झाले आहे. तसेच, नवी मुंबईत वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. 

मुंबई : मुंबईत आज माथाडी कामगारांचा मोर्चा निघणार आहे. मस्जिद बंदर ते विधान भवन असा हा मोर्चा असणार आहे. यासाठी नवी मुंबईतून सीएसटीएम स्थानकाकडे अनेक माथाडी कामगार रवाना झाले आहे. तसेच, नवी मुंबईत वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. माथाडी व सुरक्षा रक्षक कामगार बचाव कृती समितीने सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाने माथाडी कायदा व मंडळांचे अस्तित्व संपविण्याचे षडयंत्र रचले आहे. १० फेब्रुवारी २०१६, ६ सप्टेंबर २०१६ व १७ जानेवारी २०१८ ला तीन शासन आदेश काढले आहेत. या आदेशामुळे कामगारांचे अस्तित्व संपण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे राज्यातील ४० कामगार संघटना एकत्र येवून आज भव्य मोर्चा काढण्यार आहेत. यासाठी नेमलेल्या कृती समितीचे नेतृत्व बाबा आढाव, नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, अविनाश रामिष्टे, बळवंतराव पवार, पोपटराव पवार करणार आहेत. एक लाखपेक्षा जास्त कामगार आंदोलनामध्ये सहभागी करण्यासाठी संघटनांनी तयारी केली होती. आंदोलनाच्या इशा-यानंतर सरकार हादरले असून सर्व प्रमुख मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. १७ जानेवारीला काढलेला वादग्रस्त अध्यादेश विनाअट मागे घेण्यात येणार आहे. यापूर्वीच्या दोन आदेशांमधील माथाडी कायदा व कामगारांसाठी त्रासदायक असणा-या तरतुदी वगळण्यात येणार आहेत. सुरक्षा रक्षकांचेही अनेक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.दरम्यान, माथाडी कामगार आज मस्जीद बंदर येथे एकत्र जमा होत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील कामगार कांदा बटाटा मार्केटमध्ये एकत्रित जमत आहेत. तसेच, मोर्चासाठी सानपाडा रेल्वे स्टेशनवरून मस्जीद बंदरपर्यंत जात आहेत. या मोर्चामध्ये हजारो कामगार जमणार आहेत. मस्जीदबंदरमध्ये मोर्चाचे विजयी मेळाव्यात रूपांतर होणार आहे. शासनाने कोणत्या मागण्या मान्य केल्याची माहिती दिली जाणार आहे. स्वत: कामगार मंत्री मोर्चाला सामोरे होवून वादग्रस्त अध्यादेश रद्द केल्याचा व इतर प्रश्न सोडविण्याविषयी आश्वासन देणार आहेत.

टॅग्स :पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमुंबई