Join us

ऑनलाइन शिक्षणात गणित झाले अवघड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 4:07 AM

शिक्षकांनी मांडले मतलाेगाे : २२ डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिवसलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कठीण विषय म्हणून ...

शिक्षकांनी मांडले मत

लाेगाे : २२ डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कठीण विषय म्हणून ज्या विषयाकडे पाहून विद्यार्थी नाके मुरडतात, तो गणित विषय ऑनलाइन शिक्षणाच्या काळात आणखी कठीण वाटू लागला आहे. या काळात ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना ताे शिकण्यासाठी, समजण्यासाठी कठीण जात आहे, तसेच तो शिक्षकांना, प्राध्यापकांनाही शिकवण्यासाठी कठीण वाटत असल्याचे मत सर्वेक्षणद्वारे शिक्षकांनी मांडले आहे.

एनसीईआरटीच्या एका सर्वेक्षणानुसार विद्यार्थी, पालकांनाच नाही, तर ७५ टक्क्यांहून अधिक मुख्याध्यापकांनाही अडचणी येत असल्याचे मत त्यांनी मांडले. त्यामुळे गणितीय संकल्पना ऑनलाइन शिकवणीद्वारे सोप्या व सहज पद्धतीने कशा शिकवायच्या, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

गणितात अनेक भौमितिक सिद्धांत, समीकरणे असतात, बीजगणितीय सूत्रे फळ्यावर टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना समजावून शिकवावी लागतात. त्यातल्या शंका प्रत्यक्ष दाखविल्याशिवाय समजून घेणे विद्यार्थ्यांना शक्य नसल्याने हे विषय ऑनलाइन शिकविणे शक्य नसल्याचे शिक्षक, मुख्याध्यापकांनी सांगितले. गांधी बालमंदिर येथील समुपदेशक व शिक्षक असणाऱ्या जयवंत कुलकर्णी यांनी सर्वेक्षणातून विद्यार्थी पालकांच्या प्रतिक्रिया, मते, सूचना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामधून ३२.२ टक्के विद्यार्थ्यांनी गणित हा विषय ऑनलाइन शिकण्यास अवघड जात असल्याचे मान्य केले, तर १६ टक्के विद्यार्थ्यांना विज्ञान शिकण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

* शाळा सुरू हाेण्याची प्रतीक्षा

गणित हा माझा आवडता विषय आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यापासून गणित शिक्षकांसोबत प्रत्यक्षात शिकताना जी मजा येत होती, ती आता येत नाही, विषय कंटाळवाणा वाटत असल्याची प्रतिक्रिया अनुश्री दातार या सातवीतील विद्यार्थिनीने दिली. शाळा सुरू झाल्या की, गणितासारखे महत्त्वाचे विषय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकविता येतील, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, तसेच गणिताच्या अनेक स्पर्धा परीक्षांमधून शिष्यवृत्त्यांचा मार्ग मोकळा होतो, ते बंद होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली.

...............................