अतुल कुलकर्णी
मुंबई महापालिकेत काय होणार? धनुष्यबाण कोणाला मिळणार? की चिन्ह गोठवले जाणार? या प्रश्नांपेक्षाही उत्तर भारतीय मतं कोणाच्या बाजूने जाणार? ती एकत्रित आणण्याची क्षमता कोणामध्ये आहे? ती एकत्रित कशी आणता येतील? या प्रश्नांची उत्तरं सध्या मुंबईच्या राजकारणात आकंठ बुडालेली नेते मंडळी सोडवण्याच्या मागे लागली आहेत. मुंबईत भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्यांचे ५२ उमेदवार कमीत कमी २५०० मतांनी पराभूत झाले होते. आज २२७ वॉर्डात मिळून उत्तर भारतीयांची तब्बल १६ लाख ४५ हजार मतं आहेत. प्रत्येक वॉर्डात उत्तर भारतीयांची कमीत कमी ३५०० आणि जास्तीत जास्त २२,५०० अशी मतं आहेत. याचा अर्थ ही सगळीच्या सगळी मतं एकगठ्ठा पडतील, अशी स्थिती आज नाही. ही परिस्थिती बदलता येईल का? याची चाचपणी भाजपकडून केली जात आहे. कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहेच. शिवाय संघाचे पाठबळ असणाऱ्या विद्या ठाकूर, नुकतेच आमदार झालेले राजहंस सिंह ही मंडळी मुंबईत उत्तर भारतीयांचे प्रतिनिधित्व करतात. मतदानाला बाहेर पडणाऱ्या वर्गात कृपाशंकर सिंह यांचे प्राबल्य आहे. शिवाय मतदान करून घेण्याची त्यांची क्षमताही आहे.
एका संस्थेच्या सर्व्हेनुसार मुंबईत ३१ टक्के मराठी मतं आहेत. त्यासोबत २६ टक्के उत्तर भारतीय, १३ टक्के गुजराती आणि १३ टक्के मुस्लिम मतदार आहेत. ही बेरीज ८३ टक्के होते. ज्या नियोजन पद्धतीने सध्या उत्तर भारतीयांनी मतदारयादीत नावनोंदणी करणे सुरू केले आहे ते पाहिले तर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत तो आकडा २८ टक्क्यांच्या वर जाईल. अशा स्थितीत निवडणुकीच्या निकालाचे गणित बदलण्याची क्षमता या टक्केवारीत आहे. शिवसेनेला स्वत:च्या मूळ ८४ जागा टिकवून नव्याने जास्तीच्या जागा जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. ज्या पद्धतीने भाजपने राज्यात सत्तांतर घडवून आणले त्यातून उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती निर्माण झाली आहे आणि गेल्या काही दिवसांत भाजपला पराभूत करण्याचे काम शिवसेना करू शकते, असा समज मुस्लिम समाजात वाढीस लागत आहे. या दोन जमेच्या बाजू ठाकरेंसाठी असल्या तरी शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडून मुस्लिम मतांच्या जोरावर उभी राहू पाहते, हा विचारच शिवसेनेच्या आजवरच्या जडणघडणीला धक्का देणारा आहे.
मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा दिलेला नारा शिवसेनेच्या फायद्याचा असला तरी (याच कॉलममध्ये ५ सप्टेंबर रोजी लिहिल्यानुसार) काँग्रेसमध्ये आता कारण नसताना मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या बदलाच्या पुड्या सोडणे सुरू झाले आहे. काँग्रेसमधली सुंदोपसुंदीच या पक्षाला कायम संकटात टाकत आली तरीही त्यातून कोणालाही शहाणपण शिकावेसे वाटत नाही. मुंबईत ३६ आमदारांपैकी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या आमदारांत अस्लम शेख, झिशान सिद्दीकी, अमिन पटेल, नवाब मलिक आणि वर्षा गायकवाड तर समाजवादी पक्षातर्फे अबू आझमी निवडून आलेले आहेत. याचा दुसरा अर्थ काँग्रेसला मुंबईत स्वत:चा बेस इतर समाजात वाढवता आलेला नाही, असाही होतो. राष्ट्रवादीकडे मुंबईत नवाब मलिकसारखा चेहरा होता; पण तेही आता जेलमध्ये आहेत. राहिला प्रश्न मनसेचा. गेल्या मनपा निवडणुकीत मनसेमुळे शिवसेनेचे २७ उमेदवार पराभूत आणि भाजपचे १८ उमेदवार निवडून आले होते. राज ठाकरे यांना या निवडणुकीच्या निमित्ताने अमित ठाकरे यांचे नेतृत्व उभे करण्याची चालून आलेली संधी ते गमावणार नाहीत. मनसे मोठी होण्याने शिवसेनेचे नुकसान आणि फायदा भाजपचा होईल. आजवरची आकडेवारी तरी तेच सांगत आहे.
शिवसेनेच्या १४ आमदारांपैकी जवळपास पाच आमदार एकनाथ शिंदे गटासोबत गेलेले आहेत. उरलेल्यांपैकी काही आमदार, चिन्हाचे काय होणार ते पाहून स्वत:चा निर्णय घेतील, असे बोलले जाते. अशा आमदारांशी जवळचे संबंध असणाऱ्या त्या त्या भागातल्या माजी नगरसेवकांचे त्यामुळेच अजूनही तळ्यातमळ्यात सुरू आहे. या सगळ्या साठमारीत उत्तर भारतीय मतांना एकत्र कसे आणता येईल, यासाठी भाजपने पडद्याआड प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या काळात एमएमआर क्षेत्रातल्या नऊ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी जवळपास पावणेदोन कोटी मतदार मतदान करतील. एमएमआर भागात सर्वत्र उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. येत्या काळात मुंबईत उत्तर भारतीय नेत्यांच्या चकरा मोठ्या प्रमाणावर सुरू होतील. तेव्हा हा यूपी, बिहारी नेमका कोणावर ठरेल भारी हे कळेल. मात्र, याचा अर्थ या निकालाचा परिणाम लगेच राज्यभर होईल, असे निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.
सदा सरवणकर आणि उद्धव सेनेत काही दिवसांपूर्वी मुंबईत राडा झाला. ही सुरुवात आहे. असे राडे येत्या काळात वाढले आणि ही निवडणूक एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत गेली तर आश्चर्य वाटून घेऊ नका, अशा शब्दांत एका प्रमुख पक्षाच्या नेत्याने दिलेली प्रतिक्रिया; मुंबई-ठाण्याच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे, हे सांगण्यास पुरेशी आहे.
पक्ष लढवलेल्या जिंकलेल्या मिळालेली मतांची जागा जागा मते टक्केवारी शिवसेना २२७ ८४ १४,४३,९६९ २८.४४%भाजप २११ ८२ १३,९२,६७६ २७.८१%काँग्रेस २२३ ३१ ८,१३,१७७ १६.४९%राष्ट्रवादी काँग्रेस १७० ०९ २,४२,१४७ ६.७०%मनसे २०३ ०७ ३,९४,०६३ ७.७३%सपा ७८ ०६ — —एमआयएम ५९ ०२ — —इतर — — ७,२४,५८९ —