Join us

अभियांत्रिकीसाठी गणित, भौतिकशास्त्र अनिवार्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभ्यासक्रमाच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी गणित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभ्यासक्रमाच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी गणित आणि भौतिकशास्त्र बंधनकारक नसल्याची तरतूद नियमावलीत केली आहे. विद्यार्थ्यांमधील अभियांत्रिकीची भीती दूर होण्यासाठी आणि प्रवेशक्षमता वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

एआयसीटीईने बुधवारी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठीची हस्तपुस्तिका प्रसिद्ध केली आहे. यात हा बदल नमूद केला असून, केवळ रिक्त जागा भरण्यासाठी घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या क्षमतेला नुकसानकारक असल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. हस्तपुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे अभियांत्रिकी प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिसेस, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल व्होकेशनल, अ‍ॅग्रीकल्चर, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, आंत्रप्रिनरशीप यापैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाले आणि बारावीत या तीन विषयांमध्ये एकत्रित ४५ टक्के गुण (आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के) असणे आवश्यक असणार आहे. गणित व भौतिकशास्त्र हे विषय अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया आहेत. जर हेच अनिवार्य नसतील तर तयार होणारा अभियंता हा खरंच अभियंत्याची कौशल्ये शिकलेला असेल का, असा प्रश्न तज्ज्ञ या निमित्ताने उपस्थित करीत आहेत.

या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी कोणतीही अडचण जाणवणार नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच विद्यापीठांनी गणित, भौतिकशास्त्र ,अभियांत्रिकी कला यांसारखे विद्यार्थ्यांच्या सोयीचे ब्रीज कोर्सेस उपलब्ध करावेत, जेणेकरून विविध स्तरातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचा लाभ घेणे शक्य होईल, असेही एआयसीटीईने हस्तपुस्तिकेत नमूद केले आहे.