माथेरान ट्रेनची झुक झुक लांबणीवर
By admin | Published: June 24, 2017 12:25 AM2017-06-24T00:25:04+5:302017-06-24T00:25:04+5:30
अबालवृद्धांच्या पसंतीस उतरलेली माथेरानची राणी अर्थात टॉय ट्रेन आता आॅगस्ट महिन्यात धावणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अबालवृद्धांच्या पसंतीस उतरलेली माथेरानची राणी अर्थात टॉय ट्रेन आता आॅगस्ट महिन्यात धावणार आहे. पूर्वी ही सेवा जूनमध्ये सुरु होणार होती. सद्यस्थितीत टॉय ट्रेनसाठी मध्य रेल्वेने विशेष इंजिन आणले आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून दुसरे इंजिन असल्याशिवाय प्रवाशांसाठी ही ट्रेन सुरु करणे हिताचे नसल्याचे मत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंदवल्यामुळे माथेरानच्या ट्रेन-सवारीसाठी पर्यटकांना आॅगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
अमन लॉज ते माथेरान या तीन किलोमीटरच्या टप्प्यात ही टॉयट्रेन चालवण्यात येत होती. गतवर्षी दोन वेळा रुळांवरुन घसरल्याने ही सेवा बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या वतीेने घेण्यात आला होता. पर्यटकांची मोठी मागणी असलेल्या टॉय ट्रेनसाठी मध्य रेल्वेने अत्याधुनिक एअर ब्रेकची व्यवस्था असलेले इंजिन मागवले आहे. मात्र आपत्कालीन परिस्थितीत दुसरे इंजिन नसल्यामुळे तुर्तास ही सेवा बंदच ठेवण्याचा निर्णय मरेच्या वतीने घेण्यात आला आहे. शिवाय रुळाशेजारी संरक्षक भिंत उभारण्याचे काम देखील असल्या कारणामुळे टॉयट्रेनला आॅगस्टचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, टॉय ट्रेनसाठी मध्ये रेल्वेकडून तीन इंजिन उपलब्ध होणार आहे. या तीन इंजिनच्या चाचणी रुळांवरुन करण्यात येईल. त्यानंतर मुख्य सुरक्षा आयुक्तांकडून परवानगी मिळाल्यानंतर माथेरानच्या ट्रेन-सफारीचा आनंद पर्यटकांना घेण्यात येईल.