मुंबई - पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान या मिनी ट्रेनला विशेष एसी सलून डबा मोठा गाजावाजा करत जोडण्यात आला. मात्र, हा कोच प्रवाशांच्या प्रतीक्षेत यार्डातच उभा आहे. गेल्या दोन आठवड्यांत या कोचसाठी एकही बुकिंग झालेले नाही. परीक्षांचा हंगाम संपल्यानंतर कदाचित परिस्थिती पालटेल, अशी मध्य रेल्वेला आशा आहे.
माथेरानची राणी म्हणून पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या मिनी ट्रेनला २ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त विशेष एसी सलून डबा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. आलिशान अशा या सलून कोचचे विशेष कौतुकही झाले. मात्र, आठ आसनी या विशेष कोचकडे पाठ फिरविण्यालाच प्रवाशांनी पसंती दिली. महागडे तिकीट आणि ऑनलाइन बुकिंगची सोय नाही, यांमुळे एसी कोचला प्रवाशांनी नाकारले असावे, असे मत मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.
भाडे काय? सलून कोचमधून प्रवास करण्यासाठी आठ प्रवाशांकडून सोमवार ते शुक्रवार ३२,०८८ रुपये आकारले जाणार आहेत. तसेच दीड हजार रुपये प्रतितास अशीही सुविधा आहे. शनिवार आणि रविवारी हेच दर अनुक्रमे ४४,६०८ आणि १८०० रुपये असे आहेत. नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवशी त्याचप्रमाणे रात्रीच्या मुक्कामासाठी सलून कोच बुकिंगसाठी पर्यटकांना उपलब्ध आहे.
कारणे काय? मिनी ट्रेनच्या एसी कोचसाठी मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, नेरळ किंवा मध्य रेल्वेवरील कोणत्याही जवळच्या स्थानकांवर यूपीआय, पीओएस किंवा रोख रकमेद्वारे बुकिंग करता येते. नेरळ व्यतिरिक्त इतर स्टेशनवर पैसे भरले असतील तर पैसे पावती क्रमांक नेरळ कार्यालयाला जमा केल्याच्या १ दिवसाच्या आत कळवावे लागते ऑनलाईन बुकिंग नसल्याने फटका बसत आहे असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.