Join us  

माथेरान मिनीट्रेनची विश्रांती, शटल सेवा मात्र सुरू

By admin | Published: June 18, 2014 3:29 AM

माथेरान या मुंबईपासून सर्वाधिक जवळ असलेल्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व पर्यटकांना हवीहवीशी वाटणारी नेरळ - माथेरान मिनीट्रेन सोमवारपासून पावसाळी विश्रांतीसाठी गेली

कर्जत : माथेरान या मुंबईपासून सर्वाधिक जवळ असलेल्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व पर्यटकांना हवीहवीशी वाटणारी नेरळ - माथेरान मिनीट्रेन सोमवारपासून पावसाळी विश्रांतीसाठी गेली आहे. मात्र पर्यटकांची लाडकी राणी माथेरान ते अमनलॉज अशी शटलसेवेतून पर्यटकांच्या दिमतीला राहणार आहे. सोळा आॅक्टोबरपासून माथेरानच्या पर्यटकांच्या दिमतीला असलेली माथेरान राणी समजली जाणारी मिनीट्रेन आजपासून पावसाळी सुट्टीसाठी लोको शेडमध्ये विसावली आहे. त्यामुळे नेरळपासून माथेरानसाठी गेले आठ महिने सुरु असलेली मिनीट्रेनची सेवा थांबली आहे. त्यामुळे नेरळ, माथेरान आणि माथेरानचा डोंगर यांना नेहमीची सवयीची झालेली मिनीट्रेनची शिळ (हॉर्न)चा आवाज ऐकायला मिळणार नाही. ब्रिटिशकाळात सुरु झालेली नेरळ - माथेरान मिनीट्रेन पावसाळ्यात पर्यटक प्रवाशांसाठी बंद असते. या काळात मिनीट्रेनची इंजिने, प्रवासी डबे, मिनीट्रेनचा मार्ग यांची दुरु स्ती रेल्वेतर्फे केली जाते. तसेच माथेरानच्या परिसरात पडणारा मुसळधार पाऊस यामुळे दरडी कोसळण्याची असलेली शक्यता लक्षात घेवून पावसाळ्यात मिनीट्रेन प्रवाशांसाठी बंद ठेवली जाते. हा शिरस्ता नेरळ - माथेरान मिनीट्रेनने शंभर वर्षे पाळला आहे. तशी यावेळी देखील सोळा जून ते पंधरा आॅक्टोबर या कालावधीसाठी मिनीट्रेन पावसाळी सुट्टीसाठी नेरळ डिझेल लोकोमध्ये आज सकाळी विसावली. आज माथेरान येथून सकाळी सात वाजता नेरळकरिता या हंगामातील शेवटची मिनीट्रेन पर्यटक प्रवाशांना घेवून निघाली. ती गाडी नेरळ स्टेशनवर सकाळी नऊ वाजता पोहचली, ती या हंगामातील शेवटची मिनीट्रेन ठरली आहे. नेरळ - माथेरान मिनीट्रेन बंद झाली असली तरी अमनलॉज ते माथेरान ही मिनीट्रेनची शटलसेवा पावसाळ्यात देखील अखंडपणे सुरु राहणार आहे. त्यासाठी नेरळ येथून सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी चार डबे लावलेली मिनीट्रेन इंजिनासह माथेरानकरिता रवाना होईल. त्या मिनीट्रेनमधून मात्र पर्यटक आणि प्रवासी यांना प्रवास करण्याची परवानगी नसल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. शटल सेवेच्या फेऱ्या दिवसभरात पूर्ण करून मिनीट्रेन पुन्हा नेरळ लोकोमध्ये पोहचण्यासाठी सायंकाळी माथेरान येथून निघते. मात्र यावेळी देखील पर्यटक आणि प्रवासी यांना मिनी ट्रेनमधून प्रवास करता येत नाही. त्यामुळे नेरळ - माथेरान मिनीट्रेन प्रवासासाठी आता आॅक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. (वार्ताहर)