महेश चेमटे ।इको सेन्सेटिव्ह झोन असलेल्या माथेरान परिसरासाठी ई-रिक्षांच्या परवानगीचा प्रश्न गेल्या पाच वर्षांपासून सरकार दरबारी धूळ खात पडून आहे. ई-रिक्षांअभावी माथेरानमध्ये अजूनही अमानवी पद्धतीने हातरिक्षेद्वारे वाहतूक सेवा सुरू आहे. माथेरान नगर परिषद, इको-सेन्सेटिव्ह सनियंत्रक समिती यांनी ई-रिक्षांसाठीचा प्रस्ताव संबंधितांना दिलेला आहे.खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ मार्च २०१५ रोजी केंद्र शासनाकडे पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवू, असे उत्तर अधिवेशनाच्या तारांकित प्रश्नोत्तराच्या सत्रात दिले होते. तथापि ‘लाल फितीत’ अडकलेल्या माथेरान ई-रिक्षा अद्यापही ‘हिरव्या कंदिला’च्या प्रतीक्षेत आहेत.रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये सुमारे १०० वर्षांपासून अमानवी पद्धतीने हातरिक्षाचा वापर करण्यात येत आहे. वाहतुकीसाठी हातरिक्षा आणि घोड्यांचा वापर होतो. वयोवृद्धांना घोड्यांवरील प्रवास सुखकर नसल्याने, अमानवी पद्धतीने हातरिक्षातून प्रवास सुरू होतो. रिक्षातील माणसांना दोन तेतीन माणसे ओढत नेण्याच्या प्रकाराला सामाजिक कार्यकर्त्यांसह पर्यावरणवाद्यांनीही तीव्र नापसंती दर्शवली आहे. मात्र, वाहतुकीचीअन्य सोय नसल्याने ‘पर्यावरण रक्षण’ या नावाखाली अनेक वर्षांपासून अमानवी वाहतूक ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत माथेरानमध्ये ९५ परवानाधारक हातरिक्षा आणि ४६० घोडे आहेत. माथेरानची राणी अर्थात ‘टॉय ट्रेन’देखील आधुनिक इंजिनच्या प्रतीक्षेत असल्याने बंद आहे.ई-रिक्षासाठी निवेदनपर पत्रव्यवहार : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दादा भुसे, कपिल पाटील, विधान परिषद सदस्य जोगेंद्र कवाडे, स्थानिक आमदार यांनीदेखील मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना ई-रिक्षासाठी निवेदनपर पत्रव्यवहार केला आहे.दृष्टिहीन पर्यटकाचा मृत्यू३ फेब्रुवारी २०१७ रोजी मुंबई येथील पर्यटक प्रमोद राजाराम मेस्त्री (४८) हा अंध पर्यटक टॅक्सी स्टॅण्ड येथून बाजारात चालत येताना धाप लागल्याने जमिनीवर कोसळला. मात्र, रुग्णालयीन मदत तातडीने उपलब्ध होऊ न शकल्याने मेस्त्री या पर्यटकाचा रस्त्यातच मृत्यू झाला होता.
माथेरानमध्ये अजूनही ‘अमानवी हातरिक्षा’, ‘ई-रिक्षां’चा प्रस्ताव अडकला लाल फितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:36 AM