माथेरानमध्ये उधळले महागाईचे घोडे
By admin | Published: November 4, 2014 10:24 PM2014-11-04T22:24:35+5:302014-11-04T22:24:35+5:30
सुटीचा हंगाम म्हटला की, माथेरान गजबजलेले असते. मात्र आज माथेरानचे चित्र वेगळे दिसत आहे. माथेरानला जायला सर्वसामान्य पर्यटक कंटाळा करताना दिसत आहेत.
मुकुंद रांजणे, माथेरान
सुटीचा हंगाम म्हटला की, माथेरान गजबजलेले असते. मात्र आज माथेरानचे चित्र वेगळे दिसत आहे. माथेरानला जायला सर्वसामान्य पर्यटक कंटाळा करताना दिसत आहेत. कारण सर्वसामान्य पर्यटकांकडून हातरिक्षा, घोडेवाले त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहेत. त्यामुळे येथील पर्यटकांची संख्या रोडावली आहे.
रुग्णवाहिकेशिवाय अन्य मोटार वाहनांस शहरात बंदी असल्यामुळे गावामध्ये येण्यासाठी घोडेवाले व रिक्षावाले हाच पर्याय आहे. १० मिनिटांच्या प्रवासासाठी ५० रुपये प्रतिप्रवासी आहे. माथेरानमध्ये अधिकृत घोडेवाल्यांची संख्या ४६० तर रिक्षांची संख्या ९४ इतकी आहे. अनधिकृत घोड्यांची संख्या फार आहे. याशिवाय हॉटेल, लॉजिंगचे दरदेखील गगनाला भिडले आहेत. इथे येणारा प्रत्येक जण पॉइंट आणि शार्लोट तलाव पाहाण्यासाठी उत्सुक असतो. पाच पॉइंट्स, सात पॉइंट्स, बारा पॉइंट्स असे पॉइट्स दाखविण्याचे सर्कल आहे. पाच पॉइंट्समध्ये शार्लोट लेक, एक्को पॉइंट, हनीमून पॉइंट, मलंग पॉइंट आणि लुईझा पॉइंट येतात. सात पॉइंट्समध्ये अलेक्झांडर, रामबाग, लिटल चौक, बिग चौक, वन टी हिल बेलवर्ड, मार्जोरी नुक हे पॉइंट्स येतात. तर बारा पॉइंट्समध्ये एक्को, लँडस्केप हनीमून, मलंग, लुईझा, कोरोनेशनू, मुंबई पॉइंट, मलंग पॉइंट, सनसेट पॉइंट, अवार पॉइंट, मॅलेट स्प्रिंग हे पॉइंट्स येतात. हेच सर्व मुख्य पॉइंट्स आहेत. एकूण तसे ३८ पॉइंट्स आहेत. परंतु घोडेवाला, रिक्षावाल्यांनी ब्रिटिशांचीही नियमावली मोडत एकूण ५० पॉइंट्स बनविले आहेत.
पर्यटक नवीन असल्याने त्यांना इथल्या पॉइंट्सची वस्तुस्थिती माहीत नसते. याचा गैरफायदा हातरिक्षा आणि घोडेवाले घेतात. प्रमुख पॉइंट न दाखवता ते त्यांची दिशाभूल करून दोन तासांऐवजी एका तासातच भटकंती आटोपतात. १२ पॉइंट्सला जाण्यासाठी तीन तास लागतात. पण हे घोडेवाले विशेषत: दस्तुरी नाक्यावरचे घोडेवाले पर्यटकांची फसवणूक करताना दिसतात.
माथेरानमध्ये किमान चार ते पाच पोलिसांची नेमणूक करणे आवश्यक आहे. हातरिक्षा अथवा घोडेवाल्यांच्या मनमानीला आताच लगाम घातला नाही, तर पर्यटक माथेरानकडे पाठ फिरवतील. आता याचा फटका स्थानिक व्यापारी व घोडेवाल्यांना होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.