माथेरान : गेली सव्वा वर्ष बंद असलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन आणि अमन लॉज-माथेरान शटल सेवा लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी स्पष्ट केले. माथेरानमधील तीन माजी नगराध्यक्षांच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन मिनीट्रेन सुरू करण्याची मागणी केली.किरकोळ अपघात झाल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने ८ मे २०१६ पासून नेरळ-माथेरान मिनीट्रेन अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे स्थानिक जनतेचे व पर्यटकांचे सध्या प्रचंड हाल सुरू आहेत. माथेरानला वाहनबंदी असल्याने ट्रेन ही स्वस्त व महत्त्वाची वाहतूक व्यवस्था आहे. माथेरानची जीवन वाहिनी असलेली मिनी ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्यात यावी या मागणीसाठी मुंबई येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात महाव्यवस्थपक डी. के. शर्मा यांची माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर, विवेक चौधरी, नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी भेट घेतली. या भेटीत मिनीट्रेनवर आधारित माथेरानचे पर्यटन याबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शर्मा यांना अवगत करून लवकरात लवकर ट्रेन सुरू करण्याची मागणी केली. पावसाळा संपण्यापूर्वी शटल सेवा व दिवाळीच्या दरम्यान नेरळ - माथेरान प्रवासी सेवा पूर्ववत सुरू करणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून काम वेगाने सुरू असल्याचे शर्मा यांनी सांगितले. मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दिली.
माथेरानची मिनी ट्रेन लवकरच होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:45 AM