मुकुंद रांजणे, माथेरानकर्जत-माथेरान मिनीबस सेवा ११ आॅक्टोबर २००८ रोजी नागरिकांच्या सेवेसाठी सुरू केली. ६ वर्षांपूर्वी सेवा सुरू होऊन सुरुवातीलाच दोन-तीन वर्षे या मिनीबसने चांगली सेवा दिली, मात्र अल्पावधीतच परिवहन महामंडळाने या मिनीबसची कात काढून तिला म्हातारी केली. तीन ते चार वर्षांपासून प्रवाशांना सेवा देण्यास ही मिनीबस असमर्थ ठरली असल्याने नागरिकांतही नाराजी आहे.मिनीबस वेळेवर येत नाहीच उलट केव्हातरी बस निघाली आहे, असे आगारात फोन केल्यास सांगितले जाते. या पाऊण तासाच्या मार्गावर पडत-धडपडत येते किंवा घाटातूनच प्रवाशांना पायी उतरवून कर्जत आगार गाठण्याची वेळ गाडीवर ओढवते. शासन नियमानुसार कुठलेही वाहन १ लाख किलोमीटर धावल्यानंतर त्याला बंद ठेवले जाते. रस्त्यावर चालविण्याची परवानगी नाही, परंतु या मिनीबसेसनी २ लाखांपेक्षा जास्त अंतर कापले आहे. लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुकीदेखील झाल्या. त्या वेळी सर्वच उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी येतात. परंतु त्यांचे जाहीरनामे हवेतच विरतात. पोकळ आश्वासने याच घाटरस्त्यातून खाली उतरतात. माथेरानच्या विकासाबाबत, मिनीबस सेवेच्या सुखकर सोयीबाबत कुठल्याही लोकप्रतिनिधींना, नेतेमंडळींना दृष्टी नाही की काहीएक स्वारस्य नाही, अशीही टीका होताना दिसत आहे. या नाराजीचे कारण म्हणजे केवळ तीन हजारांचे अल्प मताधिक्य. येथे मोठी व्होट बँक नाही. या सहा वर्षांमध्ये परिवहन महामंडळाच्या कर्जत आगाराने किरकोळ रक्कम मेंटेनन्स, पगार जरी वजा केला तरी आजवर साडेआठ ते नऊ कोटी रुपये एवढे भरीव उत्पन्न मिनीबस सेवेच्या माध्यमातून मिळवले आहे. तरीही या बससेवेबाबत प्रशासन निष्क्रिय असून, पारदर्शक कामे होताना दिसत नाहीत. मिनीबस सेवा सुरू व्हावी हे माथेरानकरांचे चार दशकांपासूनचे स्वप्न होते. कधी नव्हे ते ११ आॅक्टोबर २००८ रोजी पूर्ण झाले. परंतु साधा २० कि.मी.चा प्रवास करण्याचे भाग्य माथेरानकरांच्या नशिबी नसावे. या शापातून आम्ही मुक्त कधी होणार? या अटीतटीच्या प्रवासामुळे अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाणे बंद केले आहे. कॉलेज शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत. कर्जत आगारात वारंवार खेटे मारून मुलांचा वेळ खर्च होत आहे. शासनाविरोधात आंदोलने करण्यासाठी इथल्या ८० टक्के सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना वेळ नाही. त्यांची घरची परिस्थिती मुळात हँड टू माऊथ अशी आहे. केवळ २० टक्के लोकांकडे स्वत:च्या गाड्या आहेत. त्यांना याबाबत काहीही घेणेदेणे नाही. मतांच्या राजकारणामुळे माथेरान उपेक्षित राहिले आहे. मुलांच्या शिक्षणासाठीच दरवर्षी इथली पाच ते दहा कुटुंबे इतरत्र स्थायिक होत आहेत. कर्जत-माथेरान या २० कि.मी.साठी प्रति प्रवासी ३० रुपये, तर नेरळ -माथेरान हे घाटसेक्शन असल्याने या केवळ ७ कि.मी.साठी प्रति प्रवासी २५ रुपये तिकीट दर आकारला जात आहे.
माथेरानची मिनीबस झाली म्हातारी
By admin | Published: November 03, 2014 12:00 AM