धुक्यातून धावणार माथेरानची ‘राणी’
By admin | Published: June 10, 2017 01:14 AM2017-06-10T01:14:00+5:302017-06-10T01:14:00+5:30
एक वर्षापासून अधिक काळ बंद असलेली माथेरानची मिनीट्रेन पुन्हा रु ळावर आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : एक वर्षापासून अधिक काळ बंद असलेली माथेरानची मिनीट्रेन पुन्हा रु ळावर आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी १ जूनचा मुहूर्त त्यासाठी ठरला होता. मात्र, इंजिनाअभावी तो मुहूर्त टळला असून, आता १८ जूनपासून अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवा सुरू करण्याचे संकेत आहेत. असे झाल्यास धुक्याची दुलई बाजूला सारून धावणाऱ्या माथेरान मिनीट्रेनमधून फिरण्याचा आनंद पर्यटकांना घेता येईल.
एक वर्षापासून अधिक काळ मिनी ट्रेन सेवा बंद असल्याने रेल्वे मार्गाची वाताहत झाली होती. मात्र आता मिनीट्रेनचा मार्ग दुरुस्त झाला आहे. २३ मे रोजी झालेल्या चाचणीत काही त्रुटी समोर आल्या होत्या, तसेच इंजिनांचा अभाव यामुळे १ जूनचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला होता. आता काही सुधारणांसाठी परळ येथील लोको शेडमध्ये नेण्यात आलेले तीन इंजिन पुन्हा नेरळ लोको शेडमध्ये येणार आहेत. दोन दिवसांत हे इंजिन माथेरानच्या राणीच्या ताफ्यात परत येतील अशी सूत्रांची माहिती
आहे.
शुक्रवारीदेखील दुरुस्तीच्या कामासाठी साहित्य घेऊन मिनी ट्रेन नेरळकडून माथेरानच्या दिशेने नेण्यात आली. याशिवाय अमन लॉज ते माथेरान दरम्यान रेल्वे रुळांच्या दुतर्फा संरक्षक कठडे, दगडी संरक्षक भिंती उभारण्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात आहेत. वर्षभरापूर्वी माथेरान स्थानकातून अन्यत्र बदली करण्यात आलेले स्टेशन व्यवस्थापकांची पुन्हा माथेरानला नेमणूक करण्यात आली आहे. सर्व माथेरानकरांचे आता १८ जूनकडे डोळे लागले आहेत.