- लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : माथेरानच्या पर्यटनाचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे घोड्यांची रपेट. याच घोडेस्वारीचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक माथेरानला भेट देत असतात. दरवर्षीप्रमाणे माथेरान युथ सोशल क्लब व माथेरान गिरिस्थान नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, अश्व शर्यतींचे आयोजन केले होते. हा थरार पाहण्यासाठी माथेरानकरांसह पर्यटकांनी गर्दी केली होती. दोन दिवस आयोजित केलेल्या या अश्व शर्यतींसाठी माथेरानला येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनाकरिता, अश्वांच्या शर्यतीच्या वेळी फ्लॅट रेस, गॅलोपिंग गोल्फ हॉर्स बॅक, ट्रोटिंग रेस, म्युझिकल हॉर्स बॅक, टेन पॅकिंग, प्लॅग रेस व महिला पर्यटकांसाठी लेमन अँड स्पून अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतल्या गेल्या. अश्वशर्यतींच्या निमित्ताने अनेक नामांकित जॉकी, तसेच स्पर्धक मुंबई, पुणे, गुजरात, बंगळुरू अशा अनेक ठिकाणांहून माथेरानला आवर्जून आले होते. माथेरान युथ सोशल क्लबचे संस्थापक प्रदीप दिवाडकर यांनी माथेरानच्या पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने क्लबची स्थापना करून दरवर्षी अश्व शर्यतींचे आयोजन करीत असून, हीच परंपरा कायम राहावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. या अश्व शर्यतींसाठी प्रमुख परीक्षक म्हणून नीता निहलानी, प्रसाद सावंत, चंद्रकांत चौधरी, अडी बरु चा यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप आदी उपस्थित होते. वडील प्रदीप दिवाडकर यांच्या प्रेरणेने माथेरान युथ सोशल क्लब संस्थेची घोडदौड सुरू झाली. गेली तीन वर्षे सर्व सहकाऱ्यांसह ही जबाबदारी मी पेलत आहे. अश्वशर्यतींमुळे पर्यटनाला खऱ्या अर्थाने चालना मिळते. मुंबई-पुण्याहून जॉकी येतात. स्थानिकांचा रोजगार वाढतो. इतकेच नव्हे तर माथेरानच्या अश्वचालकांना आपली कला दाखविण्याची संधीही मिळते. - प्रशांत प्रदीप दिवाडकर, अध्यक्ष, माथेरान युथ सोशल क्लब माथेरानमध्ये अश्व शर्यतींचा आनंद पाहावयास मिळतो. हिरव्यागार वनराईने आच्छादलेले मैदान, डोंगरदऱ्यांमुळे अंगावर येणारा थंड वारा आदींमुळे अश्वशर्यतीत एक प्रकारचा थरार निर्माण होतो. दरवर्षी मुंबईहून पोनी रायडर्स बोलावून स्पर्धेच्या आयोजनात सहभागी होते. - नीता निहलानी, अध्यक्ष, महाराष्ट्र पोनी रायडर्स