माथेरानच्या टॉय ट्रेनचा राजेशाही थाट, जोडला जाणार वातानुकूलित ‘मिनी महल’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 11:03 AM2023-02-03T11:03:12+5:302023-02-03T11:03:41+5:30
Train : पर्यटकांच्या खास पसंतीची असलेली माथेरानची राणी अर्थात टॉय ट्रेन आता राजेशाही थाट अनुभवणार आहे. नेरळ ते माथेरान अशा डोंगराळ प्रदेशातून धावणाऱ्या या छोटेखानी गाडीला वातानुकूलित सलून कोच अर्थात ‘मिनी महल’ जोडला जाणार आहे.
मुंबई : पर्यटकांच्या खास पसंतीची असलेली माथेरानची राणी अर्थात टॉय ट्रेन आता राजेशाही थाट अनुभवणार आहे. नेरळ ते माथेरान अशा डोंगराळ प्रदेशातून धावणाऱ्या या छोटेखानी गाडीला वातानुकूलित सलून कोच अर्थात ‘मिनी महल’ जोडला जाणार आहे. हा विशेष डबा आठ आसनी असून त्यात आलिशान सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना हॉटेलसाठी बुकिंग करण्याची गरज पडणार नाही.
मुंबईच्या नजीक असलेले माथेरान हे मुंबईकरांच्या खास पसंतीचे पर्यटन स्थळ आहे. येथील टॉय ट्रेन हे तर पर्यटकांचे विशेष आकर्षण. या टॉय ट्रेनला १०० वर्षांची परंपरा आहे. अशा या ऐतिहासिक टॉय ट्रेनला वातानुकूलित सलून कोच जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आठ आसनी या डब्यासाठी पर्यटकांना ३२ हजार रुपये मोजावे लागतील. म्हणजेच प्रतिव्यक्ती चार हजार रुपये खर्च येणार आहे.
वेळापत्रक असे...
ए- नेरळ प्रस्थान
सकाळी ०८.५० वाजता माथेरान आगमन सकाळी ११. ३० वाजता
बी- नेरळ प्रस्थान सकाळी १०. २५ वाजता माथेरान आगमन दुपारी ०१. ०५ वाजता
सी - माथेरान प्रस्थान २. ४५ वाजता नेरळ आगमन दुपारी ४. ३० वाजता
डी- माथेरान प्रस्थान दुपारी ४. ०० नेरळ आगमन संध्याकाळी ६. ४० वाजता
योजना अशी...
वातानुकूलित सलून कोचमध्ये रात्रभर मुक्काम करा - एकाच दिवशी राऊंड ट्रिप पूर्ण होईल.
सोमवार ते शुक्रवार ३२ हजार ८८ रुपये आकारले जातील आणि १ हजार ५०० प्रति तासाने पैसे आकारले जातील.
शनिवार-रविवारी ४४ हजार ६०८ रुपये सर्व करांसहित आकारले जातील.
रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप प्रवासासाठी ४४ हजार ६०८ करांसह डिटेंशन शुल्कासह १ हजार ८०० प्रति तासाने पैसे आकारले जातील.