गणित झाले सोपे : लॉकडाऊन लागू झाल्यापासून भारतभर सुरू आहेत विनामूल्य ऑनलाइन धडे; मुंबईसह कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पैसा तर सगळे कमवितात. मात्र फार कमी अशी लोक असतात जी समाधानासाठी, लोकांसाठी, समाजासाठी काही तरी करतात. समाजाचे भले म्हणजे आपले भले, असेच त्यांच्या आयुष्याचे गणित असते. असाच एक अवलिया म्हणेज संजीव कुमार. हा माणसू लॉकडाऊन लागू झाल्यापासून देशभरातल्या विद्यार्थ्यांना गणित विनामूल्य ऑनलाइन शिकवत आहे. महत्त्वाचे म्हणेज हे सगळे करताना त्यांना पदरमोड करावी लागत आहे. मात्र त्याची त्यांना फिकीर नाही. कारण मी समाजाचे काही तरी देणं लागतो आणि मला या कामातून समाधान मिळते हेच माझे भांडवल आहे, असे संजीव कुमार अभिमानाने सांगतात. संजीव यांच्याकडे मुंबईतून ६०पेक्षा विद्यार्थी गणित शिकत असून, कोल्हापूर येथीलही विद्यार्थी गणित शिकत असल्याचे त्यांनी सांगितले.
पंजाब मधल्या भटिंडा येथील केंद्रीय विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून संजीव कुमार काम करतात. कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लॉकडाऊन लागू झाले. तेव्हापासून आजपर्यंत शाळा बंद आहेत. या काळात संजीव यांनी गणिताच्या ज्ञानाचा दिवा तेवत ठेवला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून गणिताचे ऑनलाइन वर्ग विनामूल्य घेतले जात आहेत. आठवीपासून बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना गणित शिकविले जात आहे. आठवड्यातून तीन वेळा एका वर्गाचे रोज एक तास वर्ग घेतले जात आहेत. गणितामधला प्रत्येक घटक शिकविला जात असून, दोन हजार ५०० विद्यार्थी गणित शिकत आहेत. दक्षिण भारतातून सर्वाधिक विद्यार्थी गणित शिकत आहेत. काश्मीर, बिहार आणि उत्तर पूर्व भारतातून विद्यार्थी गणित शिकत आहेत. मुंबईतून ६०पेक्षा अधिक विद्यार्थी गणित शिकत आहेत. कोल्हापूर, कन्याकुमारी येथीलही विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना गणित विनामूल्य शिकविले जात आहे. हे सर्व करण्यासाठी संजीव यांना महिन्याला २० हजार रुपये एवढा खर्च येत आहे. समाजमाध्यमांवर याची जनजागृती केली जात आहे. विद्यार्थ्यांना मेल आयडी देण्यात आला आहे. याद्वारे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातात. तांत्रिक अडचणी असल्या तरी त्यावर मात केली जाते. याचा उद्देश एकाच की विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगणे हे आहे.
खेड्यापाड्यात विद्यार्त्यांना तांत्रिक अडचणी आल्या तर त्या सोडविल्या जातात. हे एक आव्हान आहे. मात्र यावर उपाय शोधले जातात. बरं हे सगळं कशासाठी? ..तर याबाबत संजीव सांगतात की, मी खेड्यातून शिकून वर आलो आहे. मला ज्या समस्या आल्या त्या आताच्या विद्यार्थ्यांना येऊ नये, असे मला वाटते. म्हणून विनामूल्य ऑनलाइन गणित शिकवले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या नऊ महिन्यांपासून एकाही विद्यार्थ्याने क्लास सोडलेला नाही, हे विशेष आहे.