मातोश्री शासकीय वसतिगृहाचा होणार कायापालट; तब्बल एक कोटीहून अधिकचा खर्च
By स्नेहा मोरे | Published: October 4, 2023 11:33 PM2023-10-04T23:33:28+5:302023-10-04T23:34:14+5:30
या कामासाठी तब्बल १ कोटी ३२ लाख ७७ हजार ३९० रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चर्चगेट येथील मातोश्री शासकीय वसतिगृहाचा लवकरच कायापालट होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने बुधवारी जाहीर शासन निर्णयानुसार, मुलांचे मातोश्री शासकीय वसतिगृहाच्या इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी मिळाली असून, या कामासाठी तब्बल १ कोटी ३२ लाख ७७ हजार ३९० रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मातोश्री या वसतिगृहाच्या इमारतीमधील तळमजला ते सहावा मजल्यावरील निवास खोल्या, हाॅल, पॅसेज, शौचालय, पायऱ्यांवरील सिमेंट व रंगकाम करण्याचे काम करण्यात येणार आहे. वसतिगृहाचे काम सुरू करताना पर्यावरण विभागाने सुचविलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा कार्यवाही करण्याची सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिली आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाची वसतिगृहे ही केंद्र बनली आहेत. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे स्थान वसतिगृहांचे आहे. त्यामुळे शैक्षणिक विकासात महत्त्वाची भूमिका असलेल्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतींच्या दुरुस्ती करून सर्व आवश्यक सोयी-सुविधांसह विद्यार्थ्यांना निवासासाठी तसेच अभ्यासासाठी पूरक वातावरणामुळे उपलब्ध होणार आहे. या निधीतून वसतिगृहांचा दर्जा अधिक उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होण्यास मदत होणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने म्हटले आहे.