Join us  

‘मातोश्री’च्या सुरक्षेत कपात, १९९३ नंतर पहिल्यांदाच सुरक्षा घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 5:30 AM

ठाकरे गटाकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून शिवसैनिकच ‘माताेश्री’ची सुरक्षा करतील अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईतील अत्यंत संवेदनशील ठिकाणांत मोडणाऱ्या कलानगर येथील ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. १९९३ मध्ये झालेल्या दंगलीनंतर अतिरेक्यांच्या टार्गेटवर असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ‘माताेश्री’च्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. तब्बल ३० वर्षांनंतर अशाप्रकारे सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून शिवसैनिकच ‘माताेश्री’ची सुरक्षा करतील अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. त्याचप्रमाणे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्यात आली होती. तसेच, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनाही पोलिस सुरक्षा पुरविण्यात आली होती. शिवसेना वर्धापन दिनानंतर बुधवारी अचानक या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ‘मातोश्री’वरील पोलिसही कमी करण्यात आले आहेत.

सुरक्षेत अशा प्रकारे कपात

- उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांच्या ताफ्यातील एक एस्कॉर्ट व्हॅन कमी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातील पायलट व्हॅनही काढून घेण्यात आली आहे. सहा सुरक्षा रक्षकांऐवजी त्यांना आता केवळ तीनच सुरक्षा रक्षक गाडीसोबत देण्यात आले आहेत. कलानगरचे प्रवेशद्वार त्याचप्रमाणे ‘माताेश्री’जवळील ड्रम गेट येथील पोलिस कमी करण्यात आले आहेत. एआरपीएफचे बंदुकधारी जवानही काढून घेण्यात आले आहेत. ‘मातोश्री’वर असलेल्या १२ ते १४ पोलिसांपैकी आता केवळ चार ते पाच पोलिस ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरे