मुंबई- शिवसेना मुख्यालय असलेल्या मुंबईतील 'मातोश्री' बंगल्याबाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याचा इशारा राणा दाम्पत्यानी दिल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. 'मातोश्री' बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देत आहेत. मातोश्री हे आमच्यासाठी मंदिरासमान असल्याचं युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी म्हटलं. त्यामुळेच, शिवसैनिक आणि युवा सेनेचे कार्यकर्ते घेऊन आपण मातोश्रीबाहेर उभा असल्याचं त्यांनी सांगितलं.
राणा दाम्पत्यांस विरोध करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमले आहेत. ''मातोश्री हे आमचं श्रद्धास्थान आहे आणि तिथं येऊन कुणी आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसैनिक ते सहन करणार नाही. जशास तसं उत्तर दिलं जाईल,'' असं शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. तेही मातोश्री बाहेर शिवसैनिकांच्या नारेबाजीत सहभागी झाले होते.
धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करुन राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे. राज्याची जनता सर्व काही पाहात आहे आणि याचं उत्तर त्यांना जनताच देईल, असंही अनिल परब म्हणाले. तर, ''मातोश्री हे हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे, मातोश्री हे आम्हाला देऊळाप्रमाणे, मंदिरासमान आहे. जर, कोणी आमच्या देवळावर, मंदिरावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर साहजिकच शिवसैनिक आक्रमक होतो, त्यामुळेच आज शिवसैनिक मातोश्रीबाहेर रस्त्यावर उतरला आहे,'' असे वरुण सरदेसाई यांनी म्हटलं. दरम्यान, शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर केलेल्या गर्दीमुळे वांद्रे कलानगर परिसरात वाहतुक कोंडी निर्माण झाली आहे. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून कार्यकर्त्यांना थोपविण्याचं काम पोलीस करत आहेत.
काय आहे गर्दीचं कारण
आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचू, असा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. अमरावतीच्या युवासेनेने राणा दाम्पत्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रात्री१०.४५ दरम्यान राणा दाम्पत्याच्या घरासमोर युवासेनेने आक्रमक आंदोलन करत राणा विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या तसेच लाऊड स्पीकर हनुमान चालिसा वाजवत आंदोलन केले. ३० मिनिटे युवासेनेने राणा यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी राजा पेठ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केले, तर मातोश्रीवर जाण्याचे स्वप्न बघू नका व हिंदुत्व आमच्या रक्तात आहे, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे सागर देशमुख यांनी यावेळी दिली.