‘मातोश्री’ म्हणजे आई, ५० लाखांच्या घड्याळ भेटीवर जाधवांचं असंही स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 07:10 AM2022-03-28T07:10:10+5:302022-03-28T07:10:52+5:30
यशवंत जाधवांच्या डायरीतून समोर आली माहिती; प्राप्तिकर विभागाकडून संशयास्पद व्यवहारांची चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईतून कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली. या डायरीतील एका नोंदीमध्ये ‘मातोश्री’ला ५० लाख रुपयांचे घड्याळ आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आढळल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पण, मातोश्री म्हणजे आई असल्याचे जाधव यांनी प्राप्तिकर विभागाला सांगितले आहे.
प्राप्तिकर विभागाने २५ फेब्रुवारी रोजी जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीय बिमल अगरवाल तसेच ५ कंत्राटदारांसह ३५ ठिकाणी छापे टाकले. शोधमोहिमेत जप्त केलेल्या पुराव्यांमधून ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक ३६ स्थावर मालमत्तांची माहिती हाती लागली आहे. तर आयकर विभागाने पालिका आयुक्त म्हणून इक्बाल सिंह चहल यांनाही नोटीस बजावत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना एप्रिल २०१८पासून मंजूर झालेल्या कंत्राटांची माहिती मागवली आहे. याबाबत चौकशी सुरू असतानाच जाधव यांच्याकडील डायरीतून मातोश्रीला दिलेले ५० लाखांचे घड्याळ आणि २ कोटी रुपयांच्या भेटीची माहिती प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली.
दुसरीकडे, यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी २०२९ मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून कोलकाता येथील प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून झालेल्या व्यवहाराची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. जाधव आणि कुटुंबीयांना भायखळा येथील इमारत खरेदीसाठी सुमारे १५ कोटी रुपये कंपनीने दिले होते. जाधव कुटुंबीयांनी नंतर हे पैसे कंपनीला परत केले. कंपनीने ते न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित केल्याचे समोर आले आहे.
आईच्या वाढदिवसाला भेट
डायरीत ‘मातोश्री’च्या उल्लेखावरून प्राप्तिकर विभागाने यशवंत जाधव यांची चौकशी केली असता त्यांनी प्राप्तिकर विभागाला दिलेल्या माहितीत, ५० लाख रुपये किमतीचे हे घड्याळ त्यांनी त्यांच्या आईच्या वाढदिवसाला भेट दिले होते.
दुसरीकडे गुढीपाडव्याला त्यांनी आईच्या स्मरणार्थ गरजूंना २ कोटींच्या भेटवस्तू दिल्याचे सांगितले. याबाबत प्राप्तिकर विभाग अधिक चौकशी करत आहे.
पावणे दोन कोटींची खरेदी अन् २० कोटींना विक्री
यशवंत जाधव यांच्या सासू सुनंदा मोहिते यांनी भायखळा येथे इंपिरियल क्राऊन नावाचे हॉटेल खरेदी केले होते. हे हॉटेल न्यूजहॉक मल्टीमीडियाने भाड्याने घेतले होते. यानंतर न्यूजहॉकला बीएमसीकडून क्वारंटाईन सेंटरचे कंत्राट मिळाले होते. हे हॉटेल १.७५ कोटींना विकत घेण्यात आले होते. वर्षभरात त्याची २० कोटींना विक्री करण्यात आली. दरम्यान, या हॉटेल खरेदी व्यवहारात आता प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे.